अनन्या मोरेची अनपेक्षित बाजी
By admin | Published: December 23, 2015 01:09 AM2015-12-23T01:09:52+5:302015-12-23T01:09:52+5:30
द्वितीय मानांकित अनन्या मोरे हिने सनसनाटी निकाल नोंदवताना अग्रमानांकित आर्या ओगळेला नमवून एनएससीआय - आयएसपी ज्यूनिअर आणि डबल्स स्क्वॉश
मुंबई : द्वितीय मानांकित अनन्या मोरे हिने सनसनाटी निकाल नोंदवताना अग्रमानांकित आर्या ओगळेला नमवून एनएससीआय - आयएसपी ज्यूनिअर आणि डबल्स स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या १९ वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावले. मुलांच्या २१ वर्षांखालील गटात पुनीत पारीखने झुंजार खेळाच्या जोरावर बाजी मारली.
इंडियन स्क्वॉश प्रोफेशनल्सच्या (आयएसपी) वतीने नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय) येथे झालेल्या या स्पर्धेत मुलींच्या १९ वर्षांखालील गटात अनन्याने धक्कादायकरीत्या विजय मिळवला. पहिले दोन गेम जिंकून आश्चर्यकारक आघाडी घेतलेल्या अनन्याला तिसऱ्या गेममध्ये अनुभवी आर्याने टक्कर दिली. मात्र चौथ्या गेममध्ये अनन्याने पुन्हा एकदा बाजी मारत आर्याला ११-८, ११-८, ८-११, ११-८ असे नमवले आणि विजेतेपदावर शिक्का मारला. मुलींच्या १३ वर्षांखालील गटात पहिला गेम गमावून पिछाडीवर पडल्यानंतर ऐश्वर्या खुबचंदानीने झुंजार पुनरागमन करताना साराह वेठेकरला १०-१२, ११-४, ११-५, ११-३ असे नमवले.
मुलांच्या २१ वर्षांखालील गटात पुनीतनेदेखील पिछाडीवरून बाजी मारताना तुषार सहानीला १०-१२, १२-१०, ११-४, ११-८ असे नमवून विजेतेपद निश्चित केले. १५ वर्षांखालील गटाच्या एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात दीपक मांडलने आक्रमक खेळ करताना अविनाश यादवला ११-५, ११-८, ११-९ असे पराभूत केले. (क्रीडा प्रतिनिधी)