... आणि बांगलादेशी वाघांचे झाले मांजर !

By admin | Published: June 16, 2017 04:09 AM2017-06-16T04:09:36+5:302017-06-16T05:04:22+5:30

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या उपांत्य लढतीचा निकाल अखेर अपेक्षेप्रमाणे लागला. संपूर्ण भूतल पादाक्रांत करण्याच्या इराद्याने

... and Bangladeshi tigers got cat! | ... आणि बांगलादेशी वाघांचे झाले मांजर !

... आणि बांगलादेशी वाघांचे झाले मांजर !

Next
>- बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
 
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या उपांत्य लढतीचा निकाल अखेर अपेक्षेप्रमाणे लागला. संपूर्ण भूतल पादाक्रांत करण्याच्या इराद्याने निघालेल्या सैन्याने वाटेत येणारे अडथळे अगदी सहजपणे चिरडून पुढे वाटचाल करावी, तसे विराट सेनेने बांगलादेशला चिरडले. तसे या सामन्यापूर्वी त्यांनी डरकाळ्या फार फोडल्या. सोशल मीडियावर टिंगल केली. पण प्रत्यक्ष मैदानात भारताच्या सिंहाशी गाठ पडल्यावर त्यांना पळता भूई थोडी झाली. मँचेस्टरच्या मैदानात फक्त भारतीय सिंहाची डरकाळी घुमली आणि बांगलादेशी वाघांचे पार मांजर झाले.
बांगलादेशचा संघ युवा आहे, त्यांच्यात जोश आहे. त्यांनी काही वेळा भारताला पराभूतही केलेय. पण म्हणून प्रत्येक वेळी भारतीय संघ त्यांच्यासमोर कमकुवत ठरेल असे नाही. या सामन्यात भारतीय संघ वरचढ ठरणार हे निश्चित होते. गरज होती ती प्रतिस्पर्ध्याला कमी न लेखता सावध राहण्याची. टीम इंडियाच्या शिलेदारांनी त्याची योग्य खबरदारी घेतली आणि अगदी शांतपणे आपली रणनीती अमलात आणत बांगलादेशला गारद केले.
खरंतर बांगलादेशी खेळाडू या लढतीत प्रचंड तयारी करून उतरले होते. जागतिक क्रिकेटच्या मंचावर भारतीय संघाला मात देण्याचा त्यांचा इरादा होता. खराब सुरुवात झाल्यानंतर तमीम इक्बाल आणि मुशफिकूर रहिम खेळपट्टीवर असेपर्यंत बांगलादेशने आपल्यावर वर्चस्व राखले होते. पण केदार जाधवला गोलंदाजीसाठी आणण्याचा विराट कोहलीचा डाव भारतीय संघासाठी मास्टरस्ट्रोक ठरला. केदारने घेतलेले तमिम आणि मुशफिकूरचे बळी सामन्यात टर्निंग पॉईंट ठरले. त्यानंतर मात्र बांगलादेशी खेळाडूंना सामन्यात पुनरागमन करणे शक्य झाले नाही. 
बांगलादेशी फलंदाजांनी अडखळत धडपडत उभे केलेले 265 धावांचे आव्हान भारतीय फलंदाजांसाठी किरकोळ होते. पुढे धवन, विराट आणि रोहितच्या फलंदाजीने ते अगदीच किरकोळ बनवून टाकले.  शानदार शतकी खेळी करणाऱ्या रोहिबरोबर विराटचेही शतक पूर्ण झाले असते तर दुधात साखर पडली असती, असो. धवन, विराट आणि रोहितची धडाकेबाज फलंदाजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या अंतिम लढतीपूर्वी सुचिन्हच म्हटले पाहिजे. तसेच प्रत्येक स्पर्धेगणिक आपली कामगिरी उंचावणारा बांगलादेशचा संघ भविष्यात अधिक देदीप्यमान यश मिळवेल, हेही येथे नमूद करावे लागले. आता आपल्याला रविवारवर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यात योगायोगाने पुन्हा एकदा पाकिस्तानसोबत अंतिम लढत खेळण्याची संधी मिळालीय. त्यामुळे या लढतीचं महत्त्व शतपटीने वाढलंय. बाकी फायनलमध्ये पाकिस्तानला लोळवून अजिंक्यपद पटकावण्यात जी मजा आहे ती दुसऱ्या कशातही नाही...

Web Title: ... and Bangladeshi tigers got cat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.