... अन् गायब झालेल्या शरीरसौष्ठवपटूने रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 04:05 PM2019-02-18T16:05:11+5:302019-02-18T16:05:37+5:30

एका ओबडधोबड दगडाला आपल्या अनुभवाच्या टाक्यांनी आकार देऊन चव्हाण यांनी बिलावा नावाचे शिल्प घडवले आहे.

... and disappeared bodybuilders created history | ... अन् गायब झालेल्या शरीरसौष्ठवपटूने रचला इतिहास

... अन् गायब झालेल्या शरीरसौष्ठवपटूने रचला इतिहास

Next

मुंबई : खेळाडूला वयाची मर्यादा असते, असे म्हटले जाते. पण त्याने वयाच्या 37व्या वर्षी खेळायला सुरुवात केली. आणि फक्त सहा महिन्यांत त्याने इतिहास रचला. यापूर्वी नवोदीत मुंबई श्री आणि मुंबई श्री या दोन्ही स्पर्धा एकाही शरीरसौष्ठवपटूला जिंकता आल्या नव्हत्या. पण अनिल बिलावाने या दोन्ही जेतेपदांना गवसणी घालत इतिहास रचला आहे. नवोदित मुंबई श्री स्पर्धा जिंकल्यावर बिलावा हा गायब झाला होता. त्यानंतर थेट मुंबई श्री स्पर्धेत तो अवतरला आणि साऱ्यांनाच धक्का देत जेतेपदाचा मानकरी ठरला. बिलावाच्या पाठिशी यावेळी ठामपणे उभे राहिले ते त्याचे प्रशिक्षक संजय चव्हाण सर. एका ओबडधोबड दगडाला आपल्या अनुभवाच्या टाक्यांनी आकार देऊन चव्हाण यांनी बिलावा नावाचे शिल्प घडवले आहे. 

दोन महिन्यांपूर्वी नवोदित मुंबई श्री स्पर्धेद्वारे हर्क्युलस जिमचा अनिल बिलावा पहिल्यांदाच शरीरसौष्ठवाच्या मंचावर उतरला होता. त्यापूर्वी त्याचे नाव कुणाच्याही परिचयाचे नव्हते किंवा कुणी ऐकले नव्हते. ती त्याची पहिलीच स्पर्धा होती. संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा पठ्ठया नवोदित मुंबई श्रीमध्ये उतरला आणि त्याने अनपेक्षित जेतेपद पटकावले. त्यानंतर तो पुन्हा एकदा गायब झाला. गेल्या दोन महिन्यात तो एकाही स्पर्धेत उतरला नाही. त्यामुळे त्याच्या खेळण्याबाबत कुणालाच कल्पना नव्हती. तो थेट स्पार्टन मुंबई श्री स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या वेळी आला. तेव्हा त्याची तयारी पाहून उपस्थितांचे डोळे विस्फारले होते.

 प्राथमिक फेरीतही तोच सरस वाटत होता. त्याने आपल्या गटात  सुशील मुरकरसह  सुशांत रांजणकर, मोहम्मद शब्बीर शेखचा सहज पत्ता कापला. जेव्हा मुंबई श्रीच्या जेतेपदाच्या लढतीसाठी नऊ गटातील सर्व खेळाडू एकाच मंचावर आले तेव्हा बिलावासारखा शॉर्प मस्क्युलर कुणीच नसल्याचा साक्षात्कार सर्वांना झाला. त्याची नागाच्या फण्यासारखी पाठ म्हणजेच लॅट्स, जजेसच्या भुवया उंचावतील अशा ग्लुट्स(पार्श्वभागाला आलेला आकार), त्याच्या खांद्यावर डोंगरासारखे आलेले ट्रप्स,त्याचे बायसेप्स म्हणजेच दंड पाहून अनेकांच्या मुखी ओह माय गॉड असे शब्द आले.  अनिलच्या शरीराचा प्रत्येक भाग एका आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवाच्या तोडीचा होता. केवळ दुसरीच स्पर्धा खेळत असलेला हा हीरा इतके दिवस कुठे होता, हा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता. जेतेपदाच्या लढतीत त्याच्या पीळदार शरीरापुढे एकाचाही टिकाव लागला नाही आणि मुंबई शरीरसौष्ठवाला एक नवा हीरो मिळाला. अनिलने जेतेपदाच्या देखण्या चषकासह दीड लाखांचे रोख इनामही जिंकले.

Web Title: ... and disappeared bodybuilders created history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.