...आणि संगकारा भावुक झाला
By admin | Published: August 25, 2015 04:20 AM2015-08-25T04:20:08+5:302015-08-25T04:20:08+5:30
१५ वर्षांच्या देदीप्यमान कारकिर्दीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणारा श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकारा निरोप समारंभात भावुक झाला
कोलंबो : १५ वर्षांच्या देदीप्यमान कारकिर्दीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणारा श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकारा निरोप समारंभात भावुक झाला. दिग्गजांच्या उपस्थितीत असंख्य चाहत्यांपुढे आणि कुटुंबीयांच्या साक्षीने त्याचा कंठ दाटून आला आणि त्याने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
सामन्यानंतर झालेल्या निरोप समारंभात दिग्गजांनी संगकाराला एकापाठोपाठ एक स्मृतिचिन्ह प्रदान केले आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी संगकाराचा चेहरा समाधानाने उजळला होता. संगकाराने या वेळी त्याच्या शाळेच्या प्रिन्सिपॉलसह प्रशिक्षक आणि भारतीय क्रिकेट संघाचे आभार व्यक्त केले. संगकारा म्हणाला, ‘‘चाहते मला चमकदार कामगिरी, शतके, विश्वकप विजय याबाबत प्रश्न विचारतात, पण मी ज्या वेळी प्रेक्षक गॅलरीकडे नजर वर करून बघतो त्या वेळी मला गेल्या ३० वर्षांतील माझे सर्व मित्र माझा खेळ बघण्यासाठी उपस्थित असल्याचे दिसत आहे. मी विजयी ठरलो किंवा पराभूत झालो तरी माझ्या कुटुंबीयांचे प्रेम मात्र सतत कायम राहिले. माझ्यासाठी ही सर्वांत मोठी उपलब्धी आहे.’’ कार्यक्रमापूर्वी संगकाराने भारतीय संघातील सदस्यांसोबत हस्तांदोलन केले आणि गळाभेट घेतली. त्याने मैदानातील कर्मचाऱ्यांना स्वाक्षरी दिली आणि त्यांच्यासोबत छायचित्रेही काढून घेतली. संगकाराच्या निरोप समारंभाला उपस्थित प्रमुख अतिथींमध्ये
श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला
सिरिसेना, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे, सुनील गावसकर आणि श्रीलंकेच्या एकमेव विश्वकपविजेत्या संघाचे कर्णधार अर्जुन रणतुंगा आदींचा समावेश होता.
लोक म्हणतात कुटुंबाची निवड करता येत नाही; पण तुमच्या कुटुंबात जन्म मिळाल्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजतो. मी भावुक होत नाही; पण हा दुर्लभ योग आहे. माझे आई-वडील आणि भाऊ-बहीण येथे उपस्थित आहेत.’’
आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. संगकारासाठी आम्हाला या लढतीत विजय मिळविता आला नाही, याचे शल्य आहे. आम्ही त्याला सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आश्वासन दिले होते; पण त्यात अपयशी ठरलो. आम्ही यानंतरच्या लढतीत त्याच्यासाठी विजय मिळविण्याचा प्रयत्न करू. फलंदाजांनी त्यांची कामगिरी योग्य पद्धतीने बजावली नाही. दुसरा व तिसरा दिवस फलंदाजीसाठी सर्वोत्तम होते; पण आम्हाला त्याचा लाभ घेता आला नाही. दुसऱ्या डावात आमची कामगिरी निराशाजनक होती. आम्हाला यापेक्षा चांगली कामगिरी करता आली असती.
- अँजेलो मॅथ्यूज