अँडी मरे, निशिकोरी यांची धमाकेदार सलामी
By admin | Published: November 16, 2016 12:00 AM2016-11-16T00:00:06+5:302016-11-16T00:00:06+5:30
जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू ब्रिटनचा अँडी मरे आणि पाचव्या क्रमांकावरील जपानचा केई निशिकोरी यांनी वर्षातील अखेरच्या एटीपी
लंडन : जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू ब्रिटनचा अँडी मरे आणि पाचव्या क्रमांकावरील जपानचा केई निशिकोरी यांनी वर्षातील अखेरच्या एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत धमाकेदार विजयी सलामी दिली. दोन्ही खेळाडूंनी आपआपल्या लढतीमध्ये सहज बाजी मारताना आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले.
यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मरेने आपला धडाका कायम राखताना क्रोएशियाच्या मारिन सिलिचचा ६-३, ६-२ असा फडशा पाडला. विशेष म्हणजे मरेचा हा सलग २० वा विजय आहे. जर का मरेने आणखी चार विजय मिळवले, तर या वर्षाअखेरीस जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू म्हणून तो निरोप घेईल. मरेच्या धडाकेबाज खेळापुढे सिलिचचा काहीच निभाव लागला नाही. पहिल्या सेटमध्ये काहीसा प्रतिकार केल्यानंतर सिलिचने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमनाचे प्रयत्न सोडले.
दुसरीकडे, निशिकोरीने दणदणीत बाजी मारताना स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाचा ६-२, ६-३ असा धुव्वा उडवला. या शानदार विजयासह निशिकोरीने यूएस ओपन स्पर्धेत वावरिंकाकडून मिळालेल्या पराभवाचा वचपा देखील काढला. जॉन मॅकेन्रो गटात झालेल्या या सामन्यात विजयी झाल्यानंतर निशिकोरीचा पुढील सामना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अँडी मरेविरुद्ध होईल.
त्याचबरोबर, या सामन्यानंतर निशिकोरीला माजी यूएस विजेता सिलिचविरुध्दही दोन हात करायचे आहेत. २०१४ साली या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत निशिकोरीने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. तर, वावरिंकाने गेल्या तीन वर्षांपासून या स्पर्धेत
उपांत्य फेरी गाठण्याची कामगिरी केली आहे. (वृत्तसंस्था)