अँण्डी मरे उपांत्य फेरीत
By admin | Published: July 7, 2016 01:20 AM2016-07-07T01:20:12+5:302016-07-07T01:37:57+5:30
फ्रान्सच्या जो विल्फ्रेड सोंगाचा प्रतिकार मोडून काढत यजमान ब्रिटनच्या अँडी मरेने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्याने हा सामना ७-६ (१२-१०), ६-१, ३-६, ४-६, ६-१
सोंगाचा प्रतिकार मोडला : आता बर्डीचशी लढत
लंडन : फ्रान्सच्या जो विल्फ्रेड सोंगाचा प्रतिकार मोडून काढत यजमान ब्रिटनच्या अँडी मरेने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्याने हा सामना ७-६ (१२-१०), ६-१, ३-६, ४-६, ६-१ असा जिंकला. तब्बल ३ तास ५३ मिनिटे ही लढत रंगली. उपांत्य फेरीत मरेची लढत आता थॉमस बर्डीचशी होईल तर दुसरी उपांत्य लढत रॉजर फेडरर विरुद्ध मिलोस रॅओनिक अशी होईल. सव्वा तासाच्या वर रंगलेल्या पहिल्या सेटमध्ये मरेला सोंगाने टायब्रेकरपर्यंत झुंजवले. टायब्रेकरही बराच लांबला. त्यानंतर दुसरा सेट मरेने सहज जिंकून लढत सरळ सेटमध्ये निकालीे लावण्याच्या शक्यता निर्माण केल्या होत्या परंतु त्सोंगाने पुढचे दोन सेट जिंकून जबर मुसंडी मारली खरी, पण निर्णायक सेटमध्ये आश्चर्यजनकरित्या त्याचा खेळ ढेपाळला. मरेने ५-० अशी मोठी आघाडी घेतली. त्यानंतर त्सोंगाने एक गेम घेतला पण सातव्या गेममध्ये मरेने सर्व्हिस करताना त्सोंगाला एकही गुण घेऊ न देता बॅकहँड व्हाली विनरवर सामना संपवला. या सामन्यात मरेने १२ पैकी ६ वेळा ब्रेक पॉर्इंटचा फायदा उचलला तर त्सोंगाला १३ पैकी फक्त चार ब्रेक पॉर्इंट घेता आले. हाच फरक महत्त्वाचा ठरला.