अँडी मरेचे दिमाखदार जेतेपद

By admin | Published: November 8, 2016 03:45 AM2016-11-08T03:45:23+5:302016-11-08T03:45:23+5:30

जागतिक पुरुष एकेरी क्रमवारीत अग्रस्थानी कब्जा केल्यानंतर ब्रिटनच्या अँडी मरेने धमाकेदार कामगिरी करून पॅरिस मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकाविले

Andy Murray's brilliant title | अँडी मरेचे दिमाखदार जेतेपद

अँडी मरेचे दिमाखदार जेतेपद

Next

पॅरिस : जागतिक पुरुष एकेरी क्रमवारीत अग्रस्थानी कब्जा केल्यानंतर ब्रिटनच्या अँडी मरेने धमाकेदार कामगिरी करून पॅरिस मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकाविले. अमेरिकेच्या जॉन इस्नरला तीन सेटमध्ये रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात नमवून मरेने दिमाखात विजेतेपद उंचावले.
सर्बियाच्या जोकोविचला पिछाडीवर टाकून एटीपी क्रमवारीत पहिल्यांदाच अव्वल स्थानी पोहोचलेल्या मरेने पॅरिसमध्येही पहिल्यांदाच जेतेपदाला गवसणी घातली. तसेच यंदाच्या मोसमात मरेचे हे आठवे विजेतेपद असून, आपल्या कारकिर्दीमध्ये त्याने एकूण १४वे मास्टर्स जेतेपद पटकाविले आहे. त्याचबरोबर, यंदा वर्षाअखेरीस एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत मरे अव्वल मानांकित खेळाडू म्हणून खेळेल. लंडन येथील ओटू एरिना येथे १३ ते २० नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळविण्यात येईल.
तीन वेळचा ग्रँडस्लॅम विजेता असलेल्या मरेने दमदार खेळ करताना पॅरिस मास्टर्सच्या अंतिम सामन्यात इस्नरला आपला खेळ करण्याची फारशी संधी दिली नाही. तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात मरेने ६-३, ६-७, ६-४ अशी दमदार बाजी मारत विजेतेपदावर नाव कोरले. स्कॉडलंडचा रहिवासी असलेल्या मरेसाठी यंदाचे वर्ष कमालीचे यशस्वी ठरले आहे. आॅगस्ट महिन्यात झालेल्या रिओ आॅलिम्पिकमध्ये त्याने पुरुष एकेरीचे सुवर्ण पटकावून सलग दोनवेळा आॅलिम्पिक सुवर्ण पटकावणारा पहिला टेनिसपटू म्हणून इतिहास रचला. फ्रेंच ओपनमध्ये पराभूत झाल्यानंतर मरेने गत आठपैकी सहा स्पर्धा जिंकल्या आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Andy Murray's brilliant title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.