अनिल कुंबळे करणार कोच पदासाठी नव्याने अर्ज
By Admin | Published: June 7, 2017 12:41 AM2017-06-07T00:41:22+5:302017-06-07T00:41:22+5:30
भारतीय संघाचे सर्वांत अनुभवी आणि यशस्वी कोच ठरलेले अनिल कुंबळे या पदाच्या शर्यतीत कायम आहेत.
लंडन : भारतीय संघाचे सर्वांत अनुभवी आणि यशस्वी कोच ठरलेले अनिल कुंबळे या पदाच्या शर्यतीत कायम आहेत. त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी आटोपण्यापूर्वी नव्याने निवड पॅनेलपुढे अर्ज पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत:च्या ‘बायोडाटा’सह ते भारतीय संघाच्या भविष्याचा ‘रोडमॅप’ देखील सादर करणार आहेत.
बीसीसीआयने कुंबळे यांना कोचपदासाठी नव्याने अर्ज करण्याची गरज असून ते थेट मुलाखतीला उपस्थित राहू शकतील, असे म्हटले होते. तथापि, कुंबळे यांनी या पदासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला. कोचपदासाठी ज्यांचे अर्ज आले आहेत त्यात वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी, रिचर्ड पायबस, लालचंद राजपूत, डोडा गणेश यांचा समावेश आहे. या सर्वांच्या मुलाखती तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीमार्फत होतील. समितीत सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे.
आॅसट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज क्रेग मॅकडरमॉट यांनी देखील कोच पदासाठी अर्ज पाठविला पण त्यांचा अर्ज ३१ मे या डेडलाईनंतर आला आहे. सल्लागार समिती अर्जावर विचार केल्यानंतर मॅकडरमॉट यांना मुलाखतीसाठी बोलवायचे की नाही याबद्दल निर्णय घेईल. तीन सदस्यांची समिती पुढील मंगळवारी किंवा बुधवारी मुलाखत प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे. १८ जून रोजी चॅम्पियन्स ट्रॉफी संपणार असून भारतीय संघाला वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना व्हायचे असल्याने कोचपदाचा उमेदवार आधी निश्चित व्हावा, अशी बीसीसीआयची इच्छा आहे.
आयपीएल फायनलच्यावेळी बीसीसीआय तसेच सीओएने देखील कुंबळे यांना नव्याने अर्ज करण्यास सांगितले होते. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार कोहली आणि कोच कुंबळे यांच्यात मतभेद असल्याचे वृत्त मीडियात गाजले.
मागच्यावर्षी कुंबळे कोचसाठी पात्रता पूर्ण करीत नसताना देखील त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात सचिन, गांगुली आणि लक्ष्मण यांचाच वाटा होता. त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने मिळविलेले यश सर्वांपुढे आहे. नुकताच कोहली- कुंबळे वाद पुढे आला तेव्हा सचिन आणि गांगुली यांनी कोहलीशी चर्चा केली पण कुंबळे यांना मुलाखतीपर्यंत काहीच विचारणा करायची नाही, असे सल्लागार समितीने ठरविले असल्याचे कळते. जो कुणी नवा कोच बनेल त्या व्यक्तीकडे २०१९ च्या विश्वचषकापर्यंत दोन वर्षे पदाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते.
कुंबळे यांचा वर्षभराचा करार चॅम्पियन्स ट्रॉफी आटोपताच संपुष्टात येईल. त्यांच्यासोबत समन्वय साधण्यात त्रास होत असल्याची कोहलीसमवेत काही खेळाडूंची तक्रार होती. त्यामुळे त्यांना मुदतवाढ न देता नव्याने अर्ज मागविण्याचा बीसीसीआयने निर्णय घेतला होता. कुंबळे यांनी मात्र २५ मे रोजी स्वत:चा अर्ज बीसीसीआय पॅनेलकडे पाठवून दिला.