वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत अनिल कुंबळेकडेच प्रशिक्षकपदाची धुरा
By admin | Published: June 12, 2017 08:50 PM2017-06-12T20:50:25+5:302017-06-12T20:50:25+5:30
भारतीय संघामध्ये सध्या कप्तान विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात कथित शीतयुद्ध सुरू आहे. मात्र असे असले तरी
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - भारतीय संघामध्ये सध्या कप्तान विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात कथित शीतयुद्ध सुरू आहे. मात्र असे असले तरी भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्रे अनिल कुंबळेकडेच राहण्याची शक्यता आहे. कुंबळेची हरकत नसेल तर तोच वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळेल, असे बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी आज सांगितले.
विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात मतभेद असून, विराट कोहली कुंबळेला प्रशिक्षकपदावरून हटवण्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जात होते. मात्र विराटने मतभेदाच्या वृत्तांचे खंडन केले आहे. दरम्यान, सोमवारी झालेल्या सीओएच्या बैठकीनंतर विनोद राय म्हणाले, "प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी सल्लागार समितीची आहे. गेल्यावर्षी त्यांनीच अनिल कुंबळेची एका वर्षासाठी प्रशिक्षक म्हणून निवड केली होता. आताही त्याच प्रक्रियेचा अवलंब करण्यात येणार आहे. पण प्रशिक्षक निवडण्याच्या प्रक्रियेस उशीर झाला आहे. त्यामुळे कुंबळेची हरकत नसेल तर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी प्रशिक्षकपदाची जबाबदारी त्याच्याकडेच सोपवली जाईल,"
सध्या सुरू असलेली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आटोपल्यावर भारतीय संघ पाच एकदिवसीय आणि एक ट्वेंटी-20 सामना खेळण्यासाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील पहिला सामना 23 जूनला खेळविण्यात येणार आहे. दरम्यान, सल्लागार समितीमधील सदस्य अनिल कुंबळेला प्रशिक्षक म्हणून कायम ठेवण्याच्या बाजूने आहेत. या सल्लागार समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांचा समावेश आहे.