अनिर्बान लाहिरी, चौरासिया करणार भारताचे प्रतिनिधित्व
By Admin | Published: July 13, 2016 03:13 AM2016-07-13T03:13:21+5:302016-07-13T03:13:21+5:30
आॅलिम्पिकच्या धूमधडाक्याला काही दिवस शिल्लक असून, यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये विशेष लक्ष असेल ते गोल्फ खेळाकडे.
नवी दिल्ली : आॅलिम्पिकच्या धूमधडाक्याला काही दिवस शिल्लक असून, यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये विशेष लक्ष असेल ते गोल्फ खेळाकडे. तब्बल ११२ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर गोल्फची पुन्हा एकदा आॅलिम्पिक एंट्री झाली आहे. भारतानेदेखील या खेळामध्ये पदक जिंकण्यासाठी कंबर कसली असून, अनुभवी अनिर्बान लाहिरी आणि एसएसपी चौरासिया हे आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. त्याचप्रमाणे युवा खेळाडू अदिती अशोक ही महिला गटात भारतासाठी पदक जिंकण्याचा प्रयत्न करेल.
गोल्फसाठी ११ जुलै ही आॅलिम्पिक पात्रतेची अखेरची तारीख होती. यानंतर लाहिरी आणि चौरासिया यांनी आंतरराष्ट्रीय गोल्फ महासंघाच्या (आयजीएफ) क्रमवारीनुसार रिओ तिकीट निश्चित केले. आशियाचा अव्वल गोल्फर असलेला लाहिरी जागतिक क्रमवारीत ६२व्या स्थानी आहे, तर विद्यमान इंडियन ओपन चॅम्पियन चौरासिया जागतिक क्रमवारीत २०७व्या स्थानी आहे. त्याच वेळी आयजीएफच्या क्रमवारीत दोघेही अनुक्रमे २०व्या आणि ४५व्या स्थानी आहेत. त्यामुळे आॅलिम्पिकसाठी दोघांनीही पात्र ठरलेल्या पहिल्या ६० खेळाडूंमध्ये आपली जागा निश्चित केली.
लाहिरीने याआधी २००६ साली दोहा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना सांघिक रौप्य पटकावण्यात मोलाचे योगदान दिले. त्याच वेळी एकूण ४ आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावलेल्या चौरासियाने यंदाच्या वर्षी इंडियन ओपन किताबवर कब्जा करून आॅलिम्पिकवारी निश्चित केली. (वृत्तसंस्था)
लाहिरीने २०१५ साली
युरोपियन टूरमध्ये दोन
विजय मिळवताना पीजीए चॅम्पियनशिपमध्ये संयुक्तपणे पाचवे स्थान मिळवले होते.
गेल्या वर्षी लाहिरीने प्रेसिडेंट कप स्पर्धेत आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवणारा पहिला भारतीय म्हणून इतिहास रचला होता.
या आठवड्यात लाहिरी
स्कॉटलंड येथे ब्रिटिश ओपन गोल्फ स्पर्धा खेळणार असून,
ही स्पर्धा लाहिरीची सलग नववी मुख्य स्पर्धा असेल.
चौरासियाने एकूण
४ आंतरराष्ट्रीय विजेतेपदांसह स्वत:ची छाप पाडली आहे.
४ पैकी ३ विजेतेपद युरोपियन टूरमध्ये पटकावली.
विद्यमान आंतरराष्ट्रीय गोल्फ क्रमवारीनुसार आॅलिम्पिकमध्ये पुरुषांच्या गटात एकाहून
अधिक खेळाडू सहभागी होणाऱ्या २४ देशांमध्ये भारताचा समावेश.
रिओ आॅलिम्पिकमध्ये आशियातील ९ देशांमधून एकूण १७ गोल्फर खेळणार.