अनीश भानवालचा नेमबाजीत सुवर्णवेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 03:07 AM2018-03-27T03:07:52+5:302018-03-27T03:07:52+5:30
उदयोन्मुख नेमबाज अनीश भानवालने सोमवारी आयएसएसएफ ज्युनिअर विश्वकपमध्ये २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले
सिडनी : उदयोन्मुख नेमबाज अनीश भानवालने सोमवारी आयएसएसएफ ज्युनिअर विश्वकपमध्ये २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत भारताचे वैयक्तिक स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक आहे.
१५ वर्षीय या खेळाडूने सर्वोच्च स्कोअरसह फायनलमध्ये स्थान मिळवले होते. अंतिम फेरीत त्याला भारताच्या अनहज जावान्दा व राजकुमार सिंग संधू यांच्याव्यतिरिक्त चीनच्या तीन नेमबाजांच्या आव्हानाला सामोरे जावे लागले.
पात्रता फेरीत ५८५ गुणांसह अव्वल स्थानावर राहिलेल्या अनीशने अंतिम फेरीत २९ अचूक नेम साधताना कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय पदक पटकावले.
अनीशच्या सुवर्णपदकासह भारतीय संघाने एकूण १५ पदकांसह तालिकेत चीननंतर दुसरे स्थान गाठले. भारताच्या खात्यावर सहा सुवर्ण, तीन रौप्य व सहा कांस्यपदकांची नोंद आहे. चीनने विक्रमी १७३३ अंकांसह २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत सांघिक प्रकारात सुवर्ण पदकाचा मान मिळवला. अनीश भानवाला, जावांदा व आदर्श सिंग यांच्या संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे सांघिक कांस्यपदकही भारतीय खेळाडूंनी पटकावले. त्यात संधूसोबत जपत्येश सिंग जसपाल व मनदीप सिंग यांचा समावेश होता. (वृत्तसंस्था)
याआधी मेक्सिको येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सत्रात अनीश याच प्रकारात सातव्या स्थानी राहिला होता. यावेळी मात्र त्याने कोणतीही कसर ठेवता सहज वर्चस्व मिळवले.
विशेष म्हणजे अंतिम फेरीत अचूक पाच नेम साधणारा तो एकमेव नेमबाज ठरला आणि हाच फरक त्याच्यात व इतर नेमबाजांमध्ये राहिला. अनीसच्या धडाक्यापुढे चेंग झिपेंग आणि झांग ज्युमिंग या चिनी नेमबाजांना अनुक्रमे २७ आणि २० हीट्ससह रौप्य आणि कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.