अनीष, नीरज अंतिम फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 02:17 AM2018-03-09T02:17:36+5:302018-03-09T02:17:36+5:30
युवा नेमबाज अनीष भानवाला आणि नीरज कुमार यांनी मेक्सिकोतील गुआदालाजारा येथे सुरू असलेल्या आयएएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीकडे कूच केली आहे.
नवी दिल्ली - युवा नेमबाज अनीष भानवाला आणि नीरज कुमार यांनी मेक्सिकोतील गुआदालाजारा येथे सुरू असलेल्या आयएएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीकडे कूच केली आहे.
सिनियर विश्वचषकात पहिल्यांदा सहभागी झालेल्या १५ वर्षांच्या अनीषने पहिल्या पात्रता फेरीत तिसरे स्थान पटकविले. याच प्रकारात २०१६ च्या रिओ आॅलिम्पिकमधील तीन पदक विजेते सहभागी झाले आहेत. याच प्रकारातील राष्टÑीय चाचणीत अनीषने विश्वविक्रमाशी बरोबरी साधली होती. त्याने ३०० पैकी २९४ गुणांची कमाई केली. रिओ आॅलिम्पिकचा कांस्य विजेता चीनचा यूएहोंग ली याने देखील २९४ गुण नोंदवित दुसरे आणि नवी दिल्ली विश्वचषकाच्या फायनल्सचा रौप्य विजेता फ्रान्सचा क्लेमेंट बेसाग्वे याने २९५ गुणांची कमाई केली. अनीषचा सहकारी नीरज याने २९१ गुणांची कमाई करीत सहावे स्थान पटकविले. दरम्यान काल झालेल्या ट्रॅप मिश्र प्रकारात कायनान वेनाई आणि सीमा तोमर ही भारतीय जोडी १४ व्या स्थानावर घसरली. स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण आणि चार कांस्य पदके जिंकली आहेत.(वृत्तसंस्था)
अनिष आणि नीरज यांच्या शानदार कामगिरीनंतर विश्वचषक स्पर्धेत आणखीन पदक जिंकण्याची संधी भारतासाठी निर्माण झाली आहे. दोघांनीही पदक जिंकण्यात यश मिळवले तर पदकतालिकेतील भारताचे अव्वलस्थान मजबूत होईल.