केरळच्या क्रीडामंत्र्यांकडून अंजूचा अपमान
By admin | Published: June 10, 2016 03:52 AM2016-06-10T03:52:38+5:302016-06-10T03:52:38+5:30
अर्जुन पुरस्कार विजेती अंजू बॉबी जॉर्ज हिने केरळचे क्रीडामंत्री ईपी जयराजन यांच्यावर अपमान केल्याचा आरोप केला
त्रिवेंद्रम : लांबउडीतील आॅलिम्पिकपटू अर्जुन पुरस्कार विजेती अंजू बॉबी जॉर्ज हिने केरळचे क्रीडामंत्री ईपी जयराजन यांच्यावर अपमान केल्याचा आरोप केला आहे. केरळ क्रीडा परिषदेची अध्यक्ष असलेल्या अंजूने या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याकडे करताच क्रीडामंत्री वादात अडकले.
२००३ च्या विश्व स्पर्धेत ऐतिहासिक कांस्य विजेती अंजू म्हणाली, ‘राज्यात नवे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर मी क्रीडा परिषदेच्या उपाध्यक्षांना घेऊन क्रीडामंत्र्यांच्या भेटीला गेले. मला याआधीच्या यूडीएफ सरकारने या पदावर नेमले होते. केरळमधील खेळाच्या प्रगतीवर नवे मंत्री चर्चा करतील, असा आमचा समज होता; पण पहिल्याच बैठकीत मंत्र्यांनी आम्हाला तुम्ही मागच्या सरकारमध्ये पदावर आलात. तुम्ही दुसऱ्या पक्षाचे सदस्य असल्याने ज्या नियुक्त्या आणि बदल्या करीत आहात, त्या नियमबाह्य आहेत, असे सांगितले.
परिषदेच्या बैठकीत भाग घेण्यासाठी मी बंगलोर येथील राहत्या घरून विमानाने त्रिवेंद्रमला गेले. या विमान प्रवासावरदेखील मंत्र्यांनी आक्षेप नोंदविला. हे नियमानुसार नाही, त्यामुळे बंदी घालू शकतो. हा सर्व भ्रष्टाचार असल्याचा बेछूट आरोप मंत्र्यांनी केला. माझ्याशिवाय प्रिजा श्रीधरन, हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेश, तसेच केरळ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष टी. सी. मॅथ्यू हे केरळ क्रीडा परिषदेत अन्य सदस्य आहेत.’
मंत्र्यांनी मला तुमचे पाय भ्रष्टाचारात रुतले असल्याचे संबोधून अपमानास्पद वागणूक दिली. एका खेळाडूला अशी वागणूक मिळत असेल तर देशाचे क्रीडाक्षेत्र अव्वल दर्जाचे कसे होईल, असा सवाल अंजूने उपस्थित केला. (वृत्तसंस्था)
>म्हणे मोहम्मद अली केरळचा खेळाडू!
क्रीडामंत्री जयराजन हे याआधीही वादात अडकले. त्यांनी स्वत:च्या ज्ञानाचा परिचय देत महान चॅम्पियन बॉक्सर मोहम्मद अली यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करताना मोहम्मद अली हे केरळचे खेळाडू असल्याचे वक्तव्य केले होते. क्रीडामंत्र्यांच्या सामान्य ज्ञानावर अनेकांनी सडकून टीका केली होती.
>आरोप....
‘मी काही राजकीय पक्षाची सदस्य नाही. सरकारला काम पसंत नसेल तर आम्ही राजीनामा देण्यास तयार आहोत; पण भ्रष्टाचाराचा आरोप कदापि मान्य नाही. राजीनाम्याचा अद्याप विचार केला नाही. मंत्र्यांची वागणूक मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणे माझे कर्तव्य आहे.’
- अंजू बॉबी जॉर्ज.
>खुलासा...
‘मी आरोपांचा इन्कार करतो. माझ्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अंजू आनंदी होऊन बाहेर पडली. मी कुठलीही वाईट वागणूक दिली नाही. अंजूने मुख्यमंत्र्यांकडे माझी तक्रार केली हे देखील माझ्या माहितीत नाही.’
- ईपी जयराजन, क्रीडामंत्री केरळ.