बीसीसीआय प्रशासक मंडळाची घोषणा लांबणीवर
By admin | Published: January 21, 2017 04:54 AM2017-01-21T04:54:14+5:302017-01-21T04:54:14+5:30
(बीसीसीआय) प्रशासकांच्या नावांची घोषणा २४ जानेवारी रोजी करण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकांच्या नावांची घोषणा २४ जानेवारी रोजी करण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या यापूर्वीच्या आदेशामध्ये सुधारणा केली आहे. पूर्वीच्या आदेशानुसार राज्य संघटना व बीसीसीआयमध्ये एकूण नऊ वर्षे कार्य करणारी व्यक्ती देशातील क्रिकेटच्या या सर्वोच्च संस्थेमध्ये पद भूषविण्यास अपात्र ठरणार होती.
सर्वोच्च न्यायालयाने या आदेशामध्ये सुधारणा करताना स्पष्ट केले की, राज्य संघटना किंवा बीसीसीआय यामध्ये एकत्र नऊ वर्षांच्या कार्यकाळाचा विचार करण्यात येणार नाही.
न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचूड यांच्या पीठाने निर्देश दिले की, न्यायमित्र अनिल दिवान व गोपाल सुब्रमणियम यांच्यातर्फे प्रशासक पदांच्या नियुक्तीसाठी उपलब्ध करण्यात आलेली नावे उघड करण्यात येऊ नये.
न्यायालयाने या न्यायमित्रांना बीसीसीआयसाठी उपयुक्त प्रशासकांची नावे सुचविण्यास सांगितले होते. पीठाने विद्यापीठ, रेल्वे आणि सर्व्हिसेसच्या असोसिएशनच्या अर्जावर विचार करण्यास सहमती दर्शविली आहे. (वृत्तसंस्था)
या संघटनांचा पूर्ण सदस्यत्वाचा दर्जा रद्द करण्यात आला होता. त्यांना सहयोगी सदस्यपद बहाल करण्यात आले होते. या संघटनांतर्फे अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, या निर्णयावर फेरविचार करायला हवा. (वृत्तसंस्था)