बलाढ्य महाराष्ट्राच्या खो-खो संघाची घोषणा
By Admin | Published: May 26, 2016 12:33 AM2016-05-26T00:33:56+5:302016-05-26T00:33:56+5:30
सुरत येथे २८ ते ३० मे दरम्यान रंगणाऱ्या चौथ्या पश्चिम विभागीय कुमार व मुली राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली. मुंबई उपनगरचा
मुंबई : सुरत येथे २८ ते ३० मे दरम्यान रंगणाऱ्या चौथ्या पश्चिम विभागीय कुमार व मुली राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली. मुंबई उपनगरचा ॠषिकेश मुर्चावडे याच्याकडे कुमार संघाचे तर ठाण्याच्या दीक्षा कदम हिच्याकडे मुलींचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
गतवर्षी ओडिशा येथे झालेल्या ३५व्या कुमार व मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने दुहेरी मुकुट पटकावताना स्पर्धेत एकहाती दबदबा राखला होता. विशेष म्हणजे या वेळी ॠषिकेशने मुलांच्या गटात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानाचा वीर अभिमन्यू पुरस्कार पटकावला होता.
निवड झालेल्या कुमार
संघात मुंबई उपनगर व ठाणे येथील सर्वाधिक प्रत्येकी ३ खेळाडूंचा समावेश आहे. तर सांगलीचे दोन आणि पुणे, अहमदनगर, मुंबई शहर आणि उस्मानाबाद येथील प्रत्येकी एका खेळाडूचा संघात समावेश आहे. तसेच मुलींच्या संघात ठाणेकरांनी वर्चस्व राखले असून त्यांचे एकूण ३ खेळाडू संघात आहेत. यानंतर पुण्याचे दोन आणि रत्नागिरी, उस्मानाबाद, औरंगाबाद, अहमदनगर, मुंबई
शहर, सातारा आणि नाशिकच्या प्रत्येकी एका खेळाडूची संघात वर्णी लागली आहे.
स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ २७ मे रोजी रवाना होणार आहेत. निवड झालेल्या महाराष्ट्राच्या दोन्ही संघाचे सराव शिबीर सत्र वांद्रे येथील महात्मा गांधी विद्यामंदिर येथे सुरु आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
निवडण्यात आलेले संघ :
कुमार संघ : ॠषिकेश मुर्चावडे (कर्णधार), जयेश गावडे, प्रतीक देवरे (सर्व मुंबई उपनगर), संकेत कदम, आदित्य कांबळे, चिराग आंगलेकर (सर्व ठाणे), राहुल एडके, प्रद्युम्न पाटील (दोघेही सांगली), प्रतीक बांगर (पुणे), तेजस मगर (अहमदनगर), निखिल कांबळे (मुंबई शहर) आणि अविनाश मते (उस्मानाबाद). प्रशिक्षक : उमेश आटवणे (नाशिक). व्यवस्थापक : नितीन पानवलकर (मुंबई उपनगर)
मुलींचा संघ : दीक्षा कदम (कर्णधार), प्रियांका भोपी, रूपाली बडे (सर्व ठाणे), प्रणाली बेनके, प्रियांका इंगळे (दोघीही पुणे), तन्वी कांबळे (रत्नागिरी), ॠतुजा खरे (उस्मानाबाद), सोनाली बावणे (औरंगाबाद), निकिता मरकड (अहमदनगर), मधुरा पेडणेकर (मुंबई शहर), प्रतीक्षा खुरंगे (सातारा) आणि हेमलता गायकवाड (नाशिक). प्रशिक्षक : पंकज चवंडे (रत्नागिरी). व्यवस्थापिका : पल्लवी वेंगुर्लेकर (मुंबई उपनगर)