Wrestlers Stage Protest: राष्ट्रीय स्पर्धा रद्द झाल्यामुळे कुस्तीपटू नाराज; उदास चेहरे आणि थकलेल्या पायांनी गाठलं घर!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 04:37 PM2023-01-22T16:37:45+5:302023-01-22T16:38:36+5:30
भारताच्या स्टार कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाच्या विरोधात आवाज उठवला आहे.
नवी दिल्ली : भारताचे स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांच्यासह सर्व कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) विरोधात आवाज उठवला आहे. तेव्हापासून भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज ठप्प झाले आहे. WFI ची वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली. त्याचबरोबर गोंडा येथे होणारी नॅशनल ओपन रँकिंग टूर्नामेंटही रद्द करण्यात आल्याची माहिती इंडिया टुडे या वृत्तवाहिनीने दिली. त्यामुळे तयारी करून त्यात सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या पैलवानांची घोर निराशा झाली आहे.
कुस्तीपटू नाराज
राष्ट्रीय मानांकन खुली स्पर्धा उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात खेळवली जाणार होती. ती चालू घडामोडींमुळे रद्द करण्यात आली. त्यामुळे यात सहभागी होण्यासाठी आलेले पैलवान आता उदास चेहऱ्याने आणि थकलेल्या पायांनी आपापल्या घरी परतत आहेत. ही स्पर्धा व्हायला हवी होती, असे एका कुस्तीपटूने संवादात सांगितले. कारण यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. जे सर्व व्यर्थ गेले. मी खूप निराश आहे अशा भावना त्याने व्यक्त केल्या. अशी माहिती इंडिया टुडेने दिली आहे.
आता या सर्व कुस्तीपटूंना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महिनाभराहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ज्यासाठी कुस्तीपटूंसमोर आपले वजन राखण्याचे मोठे आव्हान असेल. तपास सुरू ठेवावा पण त्याचा कुस्तीपटूंच्या तयारीवर परिणाम झाला नसावा, असेही पैलवानांनी सांगितले.
वार्षिक सभाही रद्द
दरम्यान, क्रीडा मंत्रालयाच्या आदेशानुसार भारतीय कुस्ती महासंघाची वार्षिक बैठक देखील रद्द करण्यात आली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक अयोध्येतील हॉटेल रॉयल हेरिटेजमध्ये होणार होती. जिथे कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांनाही जावे लागणार होते. पण तेही गेले नाहीत. एवढेच नाही तर 28 राज्यांचे प्रतिनिधी, रेल्वे आणि सेवा विभागाचे 1-1 प्रतिनिधी असे 58 सदस्य या बैठकीला पोहोचणार होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"