बीसीसीआयची वार्षिक सभा आज

By Admin | Published: September 21, 2016 04:59 AM2016-09-21T04:59:27+5:302016-09-21T06:41:03+5:30

सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या लोढा समितीच्या शिफारशींच्या सावटाखाली बीसीसीआयची बुधवारी वार्षिक सभा होत आहे.

The annual meeting of the BCCI today | बीसीसीआयची वार्षिक सभा आज

बीसीसीआयची वार्षिक सभा आज

googlenewsNext


मुंबई : सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या लोढा समितीच्या शिफारशींच्या सावटाखाली बीसीसीआयची बुधवारी वार्षिक सभा होत आहे. या बैठकीमध्ये मानद सचिवपदाच्या निवडणुकीच्या मुद्याचा समावेश आहे.
बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी याबाबत अधिकृत नोटीस ३१ आॅगस्ट रोजी पाठविली होती. नव्या मानद सचिवपदासाठी बोर्डाकडे अर्ज सादर करण्याचा आज, मंगळवारी दोन तासांचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर अर्जाची छाननी होईल आणि लगेच पात्र उमदेवारांची यादी जाहीर करण्यात येईल. अनुराग ठाकूर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शिर्के यांना सचिवपदासाठी नामांकित करण्यात आले होते. त्यामुळे सचिवपदाची निवडणूक आवश्यक झाली आहे. शशांक मनोहर यांनी राजीनामा दिल्यानंतर ठाकूर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बीसीसीआयने सर्व संलग्न संघटनांना पाठविलेल्या नोटीसनुसार मानद सचिवपदाची निवडणूक बीसीसीआयच्या सध्या अस्तित्वात असलेल्या नियमानुसार होणार असून, सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतील. तसेच, कार्यसमिती व स्थायी समिती, सिनिअर व ज्युनिअर निवड समिती यांची बीसीसीआयच्या सध्याच्या नियमांनुसार नियुक्तीचा समावेश आहे. लोढा समितीच्या शिफारशींमध्ये समित्यांचा आकार छोटा करण्याची सूचना करण्यात आली असून, सर्वोच्च न्यायालयाने त्याला मंजुरी दिली आहे.
लोढा समितीने शिफारशी लागू करण्यासाठी निर्धारित वेळ दिलेली असून, बुधवारी होणाऱ्या सभेत २०१५-१६ या वर्षातील नियमित कार्यच होणे अपेक्षित आहे. बीसीसीआयची मान्यता नसलेल्या क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारचे सचिव आदित्य वर्मा यांनी यापूर्वीच लोढा समितीला विनंती केली आहे, की बैठकीचा अजेंडा बघितल्यानंतर बीसीसीआयवर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करायला हवी. (वृत्तसंस्था)
>बैठकीमध्ये ९ नोव्हेंबर २०१५ रोजी झालेल्या गेल्या वार्षिक आमसभेव्यतिरिक्त यंदा १९ फेब्रुवारी, २२ मे आणि ५ आॅगस्ट रोजी झालेल्या तीन विशेष आमसभेच्या इतिवृत्ताचे वाचन होणार आहे. बैठकीच्या अजेंडामध्ये सचिवाच्या अहवालाला स्वीकृती देणे, कोषाध्यक्षाचा रिपोर्ट आणि गेल्या आर्थिक वर्षातील आॅडिट खाते, २०१६-१७ चे वार्षिक बजेट आणि अन्य प्रकरणांवर चर्चा यांचा समावेश आहे.
>शिर्के यांचा सचिवपदावर शिक्कामोर्तब
बुधवारी होणाऱ्या ८७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बीसीसीआयच्या आगामी सचिवपदी अजय शिर्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणे निश्चित आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले, की सचिवपदासाठी शिर्के यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यांच्या सचिवपदाची औपचारिक घोषणा बुधवारी करण्यात येईल.

Web Title: The annual meeting of the BCCI today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.