आणखी एक पदकाने फेल्प्स करेल भारताच्या एकूण पदकांची बरोबरी
By Admin | Published: August 10, 2016 02:43 PM2016-08-10T14:43:25+5:302016-08-10T15:10:01+5:30
सर्वोत्तम, महान, ग्रेट, अविश्वसनीय हे शब्दही मायकल फेल्प्सचं कौतुक करायला अपुरे आहेत. फेल्प्सची कामगिरी या शब्दांपलीकडे आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - सर्वोत्तम, महान, ग्रेट, अविश्वसनीय हे शब्दही मायकल फेल्प्सचं कौतुक करायला अपुरे आहेत. फेल्प्सची कामगिरी या शब्दांपलीकडे आहे. सोप्या शब्दात फेल्प्सची महती सांगायची तर, फेल्प्सच्या खात्यात आणखी एक ऑलिम्पिक पदक जमा झाले तर, तो भारताने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या एकूण पदकांची बरोबरी करेल.
सलग चौदा-पंधरा वर्ष एका खेळावर हुकूमत गाजवणं सोप नाही. पण मायकल फेल्प्स आज जलतरणात लीलया ही कामगिरी बजावत आहे. फेल्पसने आतापर्यंत एकूण २५ ऑलिम्पिक पदके मिळवली असून, त्यात २१ सुवर्णपदकांचा समावेश आहे. २५ पदकांमध्ये दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे.
बिजींग ऑलिम्पिकमध्ये फेल्पसने एकूण आठ सुवर्णपदके मिळवली. लंडन ऑलिंम्पिकमध्ये चार सुवर्ण, दोन रौप्यपदके जिंकली. २००४ सालच्या ग्रीसमधील अथेन्स ऑलिम्पिकमध्ये एकूण आठ पदके मिळवली. त्यात सहा सुवर्णपदकांचा समावेश आहे.
भारताने आतापर्यंत मिळवलेल्या २६ पदकांमध्ये १५ पदके व्यक्तीगत आहेत आणि ११ पदके हॉकीमधील आहे. भारताला दहा सुवर्ण हॉकीमध्ये तर, अभिनव बिंद्राने २००८ बिजींग ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारतासाठी पहिले व्यक्तीगत सुवर्णपदक मिळवले होते.