चौथी मुलगी म्हणून नाव ठेवलं 'अंतिम'; तिनेच भारतासाठी जिंकलं ऐतिहासिक 'डबल गोल्ड'!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 09:52 PM2023-08-18T21:52:02+5:302023-08-18T21:52:23+5:30
Antim Panghal Success Story - आशियाई स्पर्धेसाठी झालेल्या निवड प्रक्रियेवरून विनेश फोगाटविरुद्ध न्यायालयात जाणाऱ्या अंतिम पंघलने आपल्या कामगिरीने सर्वांना अचंबित केले.
Antim Panghal Success Story - आशियाई स्पर्धेसाठी झालेल्या निवड प्रक्रियेवरून विनेश फोगाटविरुद्ध न्यायालयात जाणाऱ्या अंतिम पंघलने आपल्या कामगिरीने सर्वांना अचंबित केले. तिने २० वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात आज सुवर्णपदक पटकावले. तिने आज अंतिम सामन्यात युक्रेनच्या येफ्रेमोव्हा एमचा ४-० असा पराभव करून सुवर्णपदक नावावर केले. २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेतील हे तिचे दुसरे सुवर्णपदक ठरले अन् असा विक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. दरम्यान, ५७ किलो वजनी गटात भारताच्या रिनाने ९-४ अशा फरकाने कझाकस्तानच्या खेळाडूवर विजय मिळवून कांस्यपदक नावावर केले. यंदाच्या या स्पर्धेत भारताकडून ७६ किलो वजनी गटात प्रियाने काल सुवर्ण जिंकले होते.
अंतिम पंघलचा संघर्षमयी प्रवास..
अंतिमच्या वडिलांचे नाव रामनिवास पंघल आणि आईचे नाव कृष्णा कुमारी आहे. ती तिच्या कुटुंबातील चौथी मुलगी असल्याने पालकांनी तिचे नाव अंतिम ठेवले. तिच्या गावची प्रथा आहे की ज्या घरात अनेक मुली जन्माला येतात, त्यांना अंतिम किंवा लास्ट अशा नावांनी संबोधले जाते. जास्त मुली जन्माला येणार नाहीत या विश्वासाने लोकं असे करतात. पण, याच अंतिमने राज्यासह संपूर्ण देशाला नावलौकिक मिळवून दिला आहे.
तिच्या जन्माच्या वेळी परिस्थिती वेगळी होती. रामनिवास पंघाल यांना आधीच तीन मुली होत्या. कुटुंबाला मुलगा हवा होता पण शेवटचा मुलगा चौथी मुलगी म्हणून जन्माला आली. तिच्या आई-वडिलांनी त्यांच्या मुलीला नेहमीच पाठिंबा दिला. जेव्हा अंतिमने कुस्तीपटू बनण्याचे स्वप्न पाहिले तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले.
मोठी बहीण सरिता ही राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू आहे. अंतिम आणि सरिता दोघी हिसारपासून २० किलोमीटर दूर ट्रेनिंगसाठी जात होत्या. वडील दोन्ही मुलींना प्रशिक्षणासाठी घेऊन जायचे. अंतिमने १७ वर्षांखालील जागतिक स्पर्धेत कांस्यपदक आणि २३ वर्षांखालील आशियामध्ये रौप्य पदक जिंकले. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी अंतिमने ज्युनियर रेसलिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून भारतासाठी इतिहास रचला.