बीसीसीआयचा ढाचा उखडून टाकण्याचा प्रयत्न होतोय- अनुराग ठाकूर
By admin | Published: August 12, 2016 10:27 PM2016-08-12T22:27:14+5:302016-08-12T22:27:14+5:30
ज्या लोकांनी कधी क्रिकेट खेळले नाही, तेच आज बोर्डचे संचालन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - ज्या लोकांनी कधी क्रिकेट खेळले नाही, तेच आज बोर्डचे संचालन करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकूणच सध्या बीसीसीयाचा ढाचा उखडून टाकण्याचा प्रयत्न होत आहे, अशा शब्दांत लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याच्या निर्णयाविरोधात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर स्पष्ट निराशा व्यक्त केली.
येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना ठाकूर यांनी आपले मत व्यक्त केले. बीसीसीआय कार्यप्रणालीमध्ये बदल करण्यासाठी लोढा समितीने सुचवलेल्या अधिकतर शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या आहेत. यामध्ये बीसीसीआय पदाधिकाऱ्यांचे वय ७० वर्षांपर्यंत मर्यादित ठेवणे, कार्यकाळामध्ये खंड ठेवणे, एक राज्य एक मत, आणि राजकीय व्यक्ती, नोकरदार यांना प्रतिबंध अशा शिफारशींचा समावेश आहे.
त्याचबरोबर बीसीसीआयशी संलग्न किंवा मान्यताप्राप्त संघटनेतील कोणताही अधिकारी एकाचवेळी दोन पदांवर कार्यरत राहू शकणार नाही, या शिफारशीचाही सर्वोच्च न्यायालयाने स्वीकार केला आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे ठाकूर हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचेही अध्यक्ष आहेत. दरम्यान यावेळी ठाकूर यांनी लेखिका शोभा डे यांच्या वादग्रस्त टिप्पणीवरही जोरदार टीका केली.
-----------------------------------------------------------
शोभा डे यांनी केलेली टिप्पणी अत्यंत चुकीची आहे. याची कोणतीही आवश्यकता नव्हती. या स्तरावर पोहचण्यासाठी खेळाडूंना खूप घाम गाळावा लागतो.
- अनुराग ठाकूर