अनुषीची सुवर्ण कामगिरी
By admin | Published: June 28, 2015 12:59 AM2015-06-28T00:59:28+5:302015-06-28T00:59:28+5:30
आंतरराष्ट्रीय अॅथलिट अनुषी देसाई हिने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना थाळीफेक स्पर्धेत यजमान मुंबई उपनगरला महाराष्ट्र राज्य वरिष्ठ
मुंबई : आंतरराष्ट्रीय अॅथलिट अनुषी देसाई हिने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना थाळीफेक स्पर्धेत यजमान मुंबई उपनगरला महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. त्याचवेळी पुरुष गटाच्या २०० मी. शर्यतीमध्ये मुंबई शहरच्या अक्षय खोत याने सुवर्ण पटकावले.
मुंबई उपनगर हौशी अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने कांदिवली येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अनुषीने महिला थाळीफेकमध्ये एकहाती वर्चस्व राखताना ४१.०६ मीटरची जबरदस्त फेक करताना सुवर्ण पदक निश्चित केले. त्याचवेळी मुंबई शहरच्या कविता चौधरीने रौप्य पदकावर नाव कोरताना आपली छाप पाडली. तर ठाण्याच्या सारा वोराने कांस्य पदक मिळवले. नाशिकच्या गौरी राजोळे हिने हातोडीफेक स्पर्धेत ४१.१९ मीटरची फेक करून सुवर्ण पदक जिंकले. यामध्ये अनिता पटेल (मुंबई शहर) आणि ऊर्मिला बोरकर (अमरावती) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. पुरुष गटामध्ये मुंबई शहरच्या अक्षय खोत याने २०० मीटर शर्यतीमध्ये २१.८१ सेकंद अशी जबरदस्त वेळ नोंदवताना सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तर गौरांग आंब्रे (ठाणे) आणि किरणकुमार डोईफोडे (कोल्हापूर) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक जिंकले. ४०० मीटर शर्यतीमध्ये यजमान मुंबई उपनगरच्या लिओन पूरेखोरसडी याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम क्षणी अव्वल स्थानी वेग वाढवण्यात अपयशी ठरल्याने त्याचे सुवर्ण थोडक्यात हुकले. पुण्याच्या विकास सिंगने ४०.२० सेकंदाची जबरदस्त वेळ नोंदवताना सुवर्ण पदाकावर कब्जा केला. तर रायगडच्या सन्नी पाटीलने कांस्य पदक जिंकले. (क्रीडा प्रतिनिधी)
इतर निकाल :
महिला : ४०० मीटर : १. अर्चना आढव (पुणे), २. ए. अम्मू (ठाणे), ३. रेवती थेवर (मुंबई उपनगर).
३००० मीटर स्टीपलचेस : १. मनीषा साळुंखे (पुणे), २. मोनिका राऊत (नागपूर), ३. शीतल भगत (नागपूर).
१५०० मीटर : १. नीलम राजपूत (रायगड), २. रिशू सिंग (नाशिक), ३. सुप्रिया पाटील (रायगड).
२०० मीटर : १. रुचा पाटील (पुणे), दीपिका कोटियन (सातारा), ३. अक्षया अय्यर (ठाणे).
४०० मीटर हर्डल्स : १. सुनीता जाधव (सातारा), २. भविशा कोठारी (मुंबई शहर), ३. यामिनी ठाकरे (नागपूर)
पुरुष -
३००० मीटर स्टीपलचेस : १. नागराज कुरसने (नागपूर), २. रोहित मोरे (सोलापूर), ३. सुरेश वाघ (नाशिक).
तिहेरी उडी : १. धीरज (ठाणे), २. अविनाश पाटील (औरंगाबाद), ३. अनिश करगुटकर (ठाणे). फोटो : मुंबई उपनगरला सुवर्णपदक मिळवून देणारी अनुषी देसाई.