अनुष्का माझी शक्ती : विराट कोहली
By Admin | Published: April 15, 2015 01:37 AM2015-04-15T01:37:48+5:302015-04-15T01:37:48+5:30
क्रिकेट वर्तुळात सध्या सर्वांत चर्चेत असलेले प्रेमी जोडपे म्हणजे भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली व अनुष्का शर्मा यांचे आहे.
बंगळुरू : क्रिकेट वर्तुळात सध्या सर्वांत चर्चेत असलेले प्रेमी जोडपे म्हणजे भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली व अनुष्का शर्मा यांचे आहे. टीकाकारांचे लक्ष्य ठरल्यानंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा
आपल्या प्रेमिकेचे समर्थन केले आहे. अनुष्काची सोबत मला आवडत असून ती माझी शक्ती आहे, असे विराट म्हणाला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विराटने सांगितले की, ‘अनुष्कासोबत माझे नाते विशेष आहे. विश्वकप स्पर्धेनंतर हे नाते अधिक घट्ट झाले. आमच्या दोघांमधील प्रेम आणखी वृद्धिंगत झाले. माझ्या प्रेमाबाबत कुणी वाईट बोलले तर मला राग येणे स्वाभाविक आहे. कारण ते माझ्या खासगी जीवनात हस्तक्षेप करण्यासारखे आहे.’
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या बसमधील या हायप्रोफाईल पेअरचे एकत्र छायचित्र सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर लोकप्रिय होत आहे. विराट पुढे म्हणाला,‘अनुष्का माझी शक्ती आहे. ज्या वेळी ती माझ्यासोबत आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर होती, त्या वेळी माझी कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. अनुष्का मैदानावर उपस्थित असल्यानंतर मला विशेष आनंद मिळतो.’
पत्रकारासोबत झालेल्या बाचाबाचीबाबत बोलताना विराट म्हणाला, ‘माझे कधी-कधी स्वत:वर नियंत्रण राहत नाही; पण कुणी जर माझ्या खासगी जीवनाबाबत उलटसुलट बोलत असेल तर राग येणे स्वाभाविक आहे.’
विराट पुढे म्हणाला,‘बीसीसीआयची परवानगी मिळाल्यानंतर अनुष्का माझ्यासोबत आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर आली होती. मी शतक झळकावल्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित अनुष्काला टाळ्या वाजवताना बघून आनंद झाला. ती स्टेडियममध्ये उपस्थित असताना मी शतक ठोकले होते, याचा क्रिकेट चाहत्यांना विसर पडला. विश्वकप स्पर्धेत भारताच्या पराभवासाठी अनुष्काला जबाबदार धरण्यात येईल, याचा मी कधी विचारही केला नव्हता. मी माझे जीवन क्रिकेटला समर्पित केले आहे, याचा लोकांनी विचार करायला हवा. माझ्या हृदयाची स्पंदनं ‘इंडिया’साठी असतात आणि त्यामुळेच मैदानावर उतरल्यानंतर चमकदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असतो. याची माझ्या संघाला व अधिकाऱ्यांना चांगली कल्पना आहे. कुणापुढे हे सिद्ध करण्याची मला गरज वाटत नाही.’ (वृत्तसंस्था)
एखाद्याच्या खासगी आयुष्यात दुसरे हस्तक्षेप कसे करतात, याचे मला आश्चर्य वाटते. एखाद्याबाबत एवढे वाईट कसे काय बोलू शकतात. भारताच्या पराभवात अनुष्काची काय भूमिका आहे? ती उपस्थित असली म्हणजे मी मैदानावर सकारात्मक असतो; पण लोकांनी तिलाच लक्ष्य ठरवले, याचे आश्चर्य वाटले. विश्वकप स्पर्धेनंतर अनुष्का व माझे नाते अधिक घट्ट झाले. त्यानंतर आम्हाला एकमेकांना समजून घेण्याची चांगली संधी मिळाली.
- विराट कोहली