कुछ भी हो सकता है!
By admin | Published: April 12, 2017 03:30 AM2017-04-12T03:30:37+5:302017-04-12T03:30:37+5:30
दुखापती किंवा विश्रांती यामुळे काही खेळाडूंच्या अनुपस्थितीनंतरही आयपीएलचे १०वे सत्र शानदारपणे सुरू झाले. त्यांच्या अनुपस्थितीचा क्रिकेटच्या ‘क्वालिटी’ तसेच
- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)
दुखापती किंवा विश्रांती यामुळे काही खेळाडूंच्या अनुपस्थितीनंतरही आयपीएलचे १०वे सत्र शानदारपणे सुरू झाले. त्यांच्या अनुपस्थितीचा क्रिकेटच्या ‘क्वालिटी’ तसेच चाहत्यांवर काही परिणाम झाला, असे मला वाटत नाही. पहिल्या सत्राची तुलना केल्यास आता परिस्थिती खूप बदलली आहे. एका दशकानंतर आयपीएल ज्या पद्धतीने पुढे वाटचाल करीत आहे, त्याला थांबवणे शक्य नाही. अनुभव हेच सांगतो, की मुख्य खेळाडूंचा खराब फॉर्म किंवा अनुपस्थिती ही नव्या चेहऱ्यांना संधी देणारी ठरली. अशा कुशाग्र खेळाडूंसाठी हे एक उत्तम व्यासपीठ ठरले. यातूनच काही खेळाडंूचा राष्ट्रीय संघाचा मार्गही मोकळा झालेला आहे.
आयपीएलमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप सोडणारे रवीचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर ही त्यांतील काही नावे. दुखापती ह्या खेळ आणि खेळाडूंसाठी काही नव्या नाहीत. त्या नेहमीच धोक्याच्या असतात. त्यामुळेच प्रत्येक संघाची तुकडी ही २७ खेळाडूंची करण्यात आली. हे सर्व काही केवळ बॅक-अप आणि बॅक-अपसाठीच.मुख्य खेळाडूही अनुपस्थित असला तरी त्याचा संघावर विशेष परिणाम होत नाही. निश्चितपणे, लिलावात फ्रेन्चायझी संघ निवड कशी हाताळते, यावरही ते अवलंबून असते, हे सुद्धा आव्हानच आहे.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचेच उदाहरण घेऊया. याचा सर्वाधिक अनुभव त्यांना आलाय. के.एल. राहुल आणि मिशेल स्टार्क हे संपूर्ण स्पर्धेत तर विराट कोहली, ए. बी. डिव्हिलीयर्स यांना काही सामन्यांसाठी स्पर्धेला मुकावे लागत आहे. अशा खेळाडूंची अनुपस्थिती नुकसानकारक ठरू शकते. असे असतानाही त्यांचा संघ ख्रिस गेल, शेन वॉटसन, सॅम्युअल बद्री, क्रिस जॉर्डन, केदार जाधव, स्टुअर्ट बिन्नी, युजवेंद्र चहल, इकबाल अब्दुल्ला, सर्फराज खान, श्रीनाथ अरविंद यांच्यामुळे मजबूत आहे.‘स्टार’ नसलेतरी संघ कसा ठेवायचा, याचे नियोजन फ्रेन्चायझीने केले आहे. कागदावर हा संघ तगडा असला तरी त्यांना अजूनही चॅम्पियन होता आलेले नाही हे विशेष. जिंकण्यासाठी ‘स्ट्रॉँग टीम’ असणेच गरजेचे आहे, असेही नाही.
पहिल्या सत्रात राजस्थान रॉयल्स हा सर्वांत कमकुवत संघ होता; पण त्यांनी चॅम्पियन होण्याचा मान मिळवलाय. त्यानंतर डेक्कन चार्जर्सजिंकला. पुढील वर्षी मात्र ते तळात होते. त्यामुळे क्रिकेटच्या या छोट्या फॉर्मेटमध्ये काय होईल, हे सांगता येत नाही. गेल्यावेळचा यंदाही विजेता होईल काय? असे विचारल्यास मी गप्प बसणेच योग्य समजेन. अभिनेता अनुपम खेर यांच्या स्टाईलमध्ये सांगायचे झाल्यास ‘कुछ भी हो सकता हैं!’