अपूर्वी चंदेला ठरली अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 03:11 AM2019-05-02T03:11:28+5:302019-05-02T03:12:42+5:30
जागतिक क्रमवारी : १० मीटर एअर रायफलमध्ये वर्चस्व
नवी दिल्ली : भारताची आघाडीची नेमबाज अपूर्वी चंदेला हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविले. भारताचीच अंजुम मोदगिल हिने सुद्धा या वर्षात शानदार प्रदर्शन करताना दुसऱ्या क्रमांकावर कब्जा केला. जयपूरच्या अपूर्वी त्या पाच भारतीय नेमबाजांमध्ये आहे ज्यांनी २०२० ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवला आहे. चंदेलाने फेब्रुवारीमध्ये आयएसएस विश्वचषक स्पर्धेत २५२.९ असा विक्रमी गुण मिळवत सुवर्णपदक पटकाविले होते. तिने २०१४ मध्ये ग्लास्गो राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे.२०१८ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चंदेला हिने १० मीटर मिश्र रायफल स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले होते.
चंदेलाने आपला आनंद ट्विटरवर व्यक्त केला. तिने म्हटले की, ‘आज जगात पहिले स्थान मिळवल्याचा खूप आनंद आहे. नेमबाजी कारकीदीर्तील हा सर्वाेत्तम क्षण आहे.’ २६ वर्षीय चंदेला हिने टोकियो ऑलिम्पिकसाठी स्थान प्राप्त केले आहे. मात्र, बीजिंग येथे नुकताच झालेल्या आयएसएसएफ विश्चषकात चंदेला २०७.८ गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहिली होती. अंजुम मोदगिलने मात्र या स्पर्धेत
मिश्र सांघिक गटात दुसरे मानांकन प्राप्त केले होते. युवा नेमबाज मनु भाकर ही २५ मीटर पिस्तूल महिला गटात जगात दहाव्या क्रमांकाची नेमबाज बनली आहे. पुरुष गटामध्ये दिव्यांशसिंग पनवारने विश्वचषकात १० मीटर एअर रायफल गटात चौथे स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर दिव्यांशने बीजिंगमध्ये १० मीटर एअर रायफल आणि १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटात दोन सुवर्णपदकांची कमाई केली होती. या दिमाखदार कामगिरीसह त्याने २०२० टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतासाठी कोटासुद्धा मिळवला आहे.