लोढा समितीचा अहवाल लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2016 03:31 AM2016-02-05T03:31:55+5:302016-02-05T03:31:55+5:30
क्रिकेटमधील भ्रष्टाचार संपविण्यासाठी आणि प्रशासकीय सुधारणांसदर्भात लोढा समितीने आपल्या अहवालात केलेल्या सूचना योग्य, न्यायसंगत आणि बोध घेण्यासारख्या असल्याचे संबोधून
नवी दिल्ली : क्रिकेटमधील भ्रष्टाचार संपविण्यासाठी आणि प्रशासकीय सुधारणांसदर्भात लोढा समितीने आपल्या अहवालात केलेल्या सूचना योग्य, न्यायसंगत आणि बोध घेण्यासारख्या असल्याचे संबोधून भारतीय क्रिकेट बोर्डाने त्या आचरणात आणाव्यात अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
न्या. तिरथसिंग ठाकूर आणि न्या. फकीर मोहम्मद इब्राहिम कलिफुल्ला यांच्या पीठाने स्पष्टपणे सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने माजी मुख्य न्यायमूर्ती आर.एन.लोढा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या समितीने सुचविलेल्या शिफारशींची तंतोतंत अंमलबजावणी व्हावी, असे न्यायालयाला वाटते.
अहवालाचा सन्मान करण्यात यावा, कारण हा अहवाल न्यायपालिकेच्या सर्वाधिक प्रतिष्ठित न्यायमूर्र्तींच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आला आहे. बोर्डाने शिफारशी लागू कराव्यात आणि संभाव्य समस्यांपासून सावध राहावे, असे न्यायालयाने पुढे म्हटले आहे.
कोर्टाने अहवालातील शिफारशींच्या अंमलबाजवणीसंदर्भात आपले म्हणणे मांडण्यासाठी बीसीसीआयला चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. पुढील सुनावणी ३ मार्च रोजी होईल. बीसीसीआयचे वकील शेखर नाफडे यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, बोर्डाला आपल्या ३० सदस्यांचे मत जाणून घ्यायचे आहे. शिवाय अहवालाची संपूर्ण अंमलबजावणी झाल्यास अनेक गुंतागुंतीचा सामना करावा लागेल. लोढा समितीचा अहवाल बोर्डाने सदस्यांना पाठविला आहे. यावर कायदेशीर समितीची बैठक ७ फेब्रुवारी रोजी होईल.
बोर्डाच्या युक्तिवादावर असमाधान व्यक्त करीत न्या. ठाकूर म्हणाले,‘समितीच्या शिफारशी स्पष्ट, योग्य, न्यायसंगत आणि बोध घेण्याजोग्या आहेत. बोर्डाने या शिफारशी मानल्या नाहीत तर समिती पुढचा मार्ग स्वत: काढेल.’ (वृत्तसंस्था)