कारभार चालविण्यासाठी समिती नेमणार

By admin | Published: June 17, 2016 05:23 AM2016-06-17T05:23:59+5:302016-06-17T05:23:59+5:30

गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) घोटाळेबहाद्दर त्रिकुटाला अटक केल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.

To appoint a committee to run | कारभार चालविण्यासाठी समिती नेमणार

कारभार चालविण्यासाठी समिती नेमणार

Next

पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) घोटाळेबहाद्दर त्रिकुटाला अटक केल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. या समितीकडे जीसीएचा कारभार दिला जाईल. जीसीएचे अध्यक्ष चेतन देसाई, सचिव विनोद ऊर्फ बाळू फडके व खजिनदार अकबर मुल्ला यांना आर्थिक गुन्हे विभागाने ३.१३ कोटी रुपयांची अफरातफर प्रकरणात बुधवारी अटक केली आहे.
या कारवाईनंतर जीसीएचा कारभार व्यवस्थित चालावा, यासाठी बीसीसीआयने खबरदारी घेतली आहे. कारभारासाठी समिती नियुक्त करण्यात येणार असल्याचे बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी जाहीर केले आहे. क्रिकेट व क्रिकेटपटूंच्या हिताची काळजी घेण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल. क्रिकेट व क्रिकेटपटूंचे नुकसान होऊ देणार नाही, असे शिर्के यांनी माध्यमांना सांगितले.
जीसीएच्या घोटाळे आणि इतर वादानंतर जीसीएचे बीसीसीआयमधील सदस्यत्व रद्द करण्याची शक्यता शिर्के यांनी फेटाळली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तूर्त असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

त्रिकुटाला एक दिवस कोठडी
जीसीएच्या बुधवारी अटक केलेल्या तिन्ही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी गुरुवारी पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी मिळविली. संशयितांना न्यायदानाच्या ठिकाणी उपस्थित न करता त्यांना न्यायाधीशांच्या कचेरीत उपस्थित करण्यात आले. तेथून मुल्ला यांना गोमेकॉत (गोवा मेडिकल कॉलेज), तर चेतन व बाळू यांना पणजी पोलिसांच्या कोठडीत नेण्यात आले.

पोलिसांना हवी इतिवृत्ताची वही : जीसीएच्या इतिवृत्ताची वही पोलिसांना हवी असून ती मिळविण्यासाठी तिन्ही संशयितांची कोठडीतील चौकशी महत्त्वाची आहे, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. या वहीची माहिती संशयित देत नसल्याचा दावा त्यांनी केला. इतिवृत्ताची वही गायब झाल्याची तक्रार यापूर्वी जीसीएचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी केली होती. अध्यक्ष, सचीव व खजिनदार यांना अटक करण्याची ही पहिली वेळ आहे. जीसीएत जी अंधाधुंदी चालू आहे त्याची सखोल चौकशी व्हावी आणि पूर्ण चौकशी होऊन प्रकरणाचा छडा लागेपर्यंत सरकारने प्रशासक नेमून जीसीएचा कारभार हाताळावा. विस्कटलेली घडी व्यवस्थित झाल्यानंतर नव्याने निवडणूक घेऊन नवीन समितीकडे जीसीए सोपवावी अशी मागणी जीसीएचे आजीव सदस्य डॉ शेखर साळकर यांनी केली आहे.

जामीनसाठी धाव
तिन्ही संशयितांकडून जामीनसाठी अर्ज केले आहेत. जामीनवर शुक्रवारी दुपारी पणजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुनावणी होईल. तसेच शुक्रवारी त्यांची कोठडीची मूदत संपत असल्यामुळे त्यांच्या पोलीस कोठडीसाठी पोलीस पुन्हा प्रयत्न करतील. अकबर मुल्ला याचा रमजानचा उपवास सुरू असल्यामुळे त्याला कोठडीत ठेवले नाही. त्याला सध्या गोमेकॉत दाखल केले आहे.

Web Title: To appoint a committee to run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.