अपूर्वीचा विश्वविक्रमी ‘सुवर्ण’वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 05:35 AM2019-02-24T05:35:53+5:302019-02-24T05:35:59+5:30
विश्वचषक नेमबाजी । दहा मीटर एअर रायफलमध्ये वर्चस्व
नवी दिल्ली : भारताची स्टार नेमबाज अपूर्वी चंदेला हिने शनिवारी कर्णिसिंग शुटिंग रेंजवर सुरू झालेल्या आयएसएसएफ विश्वचषकात पहिल्याच दिवशी महिलांच्या दहा मीटर एअर रायफल नेमबाजीत विश्व विक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली.
अपूर्वीने २५२.९ गुणांच्या शानदार कामगिरीसह अव्वल स्थान पटकविले. चीनची रूओझू झाओ २५१.८ गुणांसह दुसऱ्या आणि तिची सहकारी ज्यू होंग २३०.४ गुणांसह तिसºया स्थानी राहिली. आठ महिलांच्या अंतिम लढतीत अपूर्वीने रौप्य विजेत्या खेळाडूच्या तुलनेत १.१ गुण अधिक घेतले. अपूर्वीने मागच्या विश्व चॅम्पियनशिपमधील देदीप्यमान कामगिरीच्या बळावर आगामी टोकियो आॅलिम्पिकची आधीच पात्रता मिळविली आहे. रविवारी पात्रता फेरीत तिने ६२९.३ गुणांची कमाई करीत चौथे स्थान घेतले होते.
अपूवीर्ची सुरुवात निराशाजनक होती. पहिल्या फेरीनंतर ती सातव्या स्थानी होती, परंतु तिने जबरदस्त पुनरागमन करत चौथे स्थान गाठले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. तिचा एकही निशाणा १० गुणांच्या खाली लागला नाही. सहाव्या फेरीनंतर ती अव्वल स्थानी आली. त्यानंतर तिने सलग १०.६ व १०.८ गुणांना निशाणा साधला.
अंतिम फेरीत २६ वर्षीय अपूर्वी सर्वात युवा होती. विश्कचषक स्पर्धेत तिने पहिल्यांदाच सुवर्ण जिंकले. याआधी तिला २०१५ मध्ये चँगवॉन येथे कांस्य, तर म्युनिच येथे रौप्य पटकावले होते. चिनच्या रौशू झाओ व हाँग झू यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. अपूर्वी व अंजूम मुदगील यांनी २०२० च्या टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेची पात्रता आधीच निश्चित केली आहे. त्यामुळे चीनी खेळाडूंना आॅलिम्पिकचे तिकिट मिळाले. (वृत्तसंस्था)
स्पर्धा आव्हानात्मक होती, पण मी हार मानली नव्हती. निकाल माझ्या बाजूने आल्याचा आनंद आहे. तरी आॅलिम्पिकपूर्वी बºयाच सुधारणा कराव्या लागतील. अनेक स्पर्धा खेळायच्या असल्याने कामगिरी सुधरावी लागेल. - अपूर्वी चंदेला