अर्चनाचा आनंद अल्पजीवी

By Admin | Published: July 10, 2017 01:12 AM2017-07-10T01:12:46+5:302017-07-10T01:12:46+5:30

आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला खरा

Archana enjoys short life | अर्चनाचा आनंद अल्पजीवी

अर्चनाचा आनंद अल्पजीवी

googlenewsNext

भुवनेश्वर : अकोला जिल्ह्यातील तेल्हार तालुका येथील दानापूर गावाची रहिवासी, पुणे क्रीडा प्रबोधिनीची धावपटू अर्चना आढावने भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला खरा, परंतु तांत्रिक समितीने तिला शर्यतीतून अपात्र ठरवल्याने तिचे सुवर्णपदक काढून श्रीलंकेच्या निमाली कोंडा हिला देण्यात आले. त्यामुळे सुवर्णपदकाचा अर्चनाचा आनंद अल्पजीवी ठरला.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालयांतर्गत १९९६ मध्ये स्थापन झालेल्या क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूने वरिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती आणि ही कामगिरी अर्चना आढावने केली होती.
रविवारी महाराष्ट्राच्या अर्चना आढावने ८00 मी. धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देशाचा गौरव वाढविला होता, पण हा तिचा
आनंद जास्त वेळ टिकलाच नाही. २१ वर्षीय अर्चनाला सुवर्णपदकासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली होती. श्रीलंकेच्या निमाली वालिवर्षा कोंडा हिच्याकडून तिला सुरुवातीपासूनच कडवी झुंज मिळत होती.
अंतिम रेषा पार करताना अर्चनाने २ मिनिटे ५ सेकंदाची वेळ नोंदविली होती. तर निमालीने २ मिनिटे ०५.२३ सेकंदात फिनिश लाईन गाठली होती. अर्चनाला केवळ 0.२३ सेकंदाच्या फरकाने सुवर्णपदक मिळाले
होते. नंतर निमालीच्या मार्गदर्शकांनी अंतिम रेषेजवळ अर्चनाने निमालीला धक्का मारल्याचा आक्षेप नोंदविला होता.
तांत्रिक समितीने तो आक्षेप व्हिडीओ रेकॉर्डिंग पाहून अर्चनाला दोषी मानून तिचे सुवर्णपदक काढून घेतले. त्यानंतर भारतीय संघाच्या व्यवस्थापकाने अर्चनाविरुद्ध
दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असा अर्ज दिला. परंतु ज्युरीने स्पष्ट सांगितले, की हा सर्वानुमते घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे २ मिनिटे ०५.२३ सेकंद वेळ नोंदविलेल्या निमालीला सुवर्णपदक देण्यात आले. श्रीलंकेच्याच गयांतिका थुशारी
हिला २ मिनिटे ५.२७
सेकंदाच्या वेळेमुळे रौप्य तर जपानच्या फुमिका ओमोरीला कांस्यपदक देण्यात आले.
(वृत्तसंस्था)
।अर्चनाचे सुवर्णपदक काढून घेणे हे तिच्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट आहे. ८०० मीटरच्या पुढे जेवढ्या शर्यतीत होतात त्या सर्वांमध्ये लेनची शिस्त नसते त्यामुळे धावपटूंचा एकमेकांना धक्का हा लागतोच. पण या शर्यतीत जो काही निर्णय दिला गेला त्यानुसार अर्चनाकडून कोठे तरी चूक झाली असेल. पण या स्पर्धेसाठी तिने घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. तिची आत्तापर्यंतची कामगिरी पाहता आशियाई महासंघ आणि भारतीय महासंघ तिच्या जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने नक्कीच विचारविनिमय करतील असा विश्वास वाटतो.
- सुरेश काकड, मार्गदर्शक, क्रीडा प्रबोधिनी
।सुवर्णपदक काढून घेणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तिने या स्पर्धेसाठी खूप कष्ट घेतले होते. तिने या प्रकरणाने खचून न जाता पुढील स्पर्धेत चांगली कामगिरी करावी अशी शुभेच्छा! शासन व क्रीडा खाते सदैव तिच्या पाठीशी राहील. तिची या स्पर्धेतील कामगिरी पाहता अ‍ॅथलेटिक्स महासंघ पुढील स्पर्धेसाठी प्रयत्नशील राहतील असे वाटते.
- नरेंद्र सोपल, सहसंचालक, क्रीडा विभाग

Web Title: Archana enjoys short life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.