तिरंदाजी प्रशिक्षक सुनीलकुमार निलंबित, विश्व स्पर्धेत इंग्लंडच्या महिला खेळाडूंची छेड काढल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 01:02 AM2017-10-19T01:02:00+5:302017-10-19T01:03:08+5:30
आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अर्जेंटिनामध्ये झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत प्रशिक्षकाच्या गैरवर्तनामुळे भारताचे नाव खराब झाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक सुनीलकुमार यांच्यावर इंग्लंडच्या महिला तिरंदाजांची छेड काढल्याचा आरोप...
कोलकाता : आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अर्जेंटिनामध्ये झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत प्रशिक्षकाच्या गैरवर्तनामुळे भारताचे नाव खराब झाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक सुनीलकुमार यांच्यावर इंग्लंडच्या महिला तिरंदाजांची छेड काढल्याचा आरोप लावण्यात आला आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे, स्पर्धा आयोजकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ कुमार यांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला. शिवाय या प्रकरणाची माहिती मिळताच भारतीय तिरंदाजी संघटनेने सुनीलकुमार यांना लगेच निलंबित केले, तसेच कुमार यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेशही दिले आहेत.
२ ते ८ आॅक्टोबरदरम्यान अर्जेंटिनाच्या रोसारियो शहरात झालेल्या या स्पर्धेत जमशेदपूरहून टाटा तिरंदाजी अकादमीचे प्रशिक्षक राम अवधेश आणि तिरंदाज अंकिता भगत हेही सहभागी झाले होते. या स्पर्धेत अंकिताने मिश्र स्पर्धेत सुवर्ण पटकावण्याची कामगिरी केली होती. सुनीलकुमार यांच्याविरुद्ध इंग्लंडच्या महिला तिरंदाजांनी आपल्या संघव्यवस्थापकांकडे तक्रार केली होती. त्यानंतर व्यवस्थापकाने ही बाब स्पर्धा आयोजकांना सांगितली. ही माहिती कळताच आयोजकांनी लगेच कुमार यांना देश सोडून जाण्यास सांगितले. हरियानाचे रहिवासी असलेले सुनीलकुमार कंपाऊंड संघाचे प्रशिक्षक असून अर्जुन पुरस्कारविजेता तिरंदाज संदीप कुमारचे वैयक्तिक प्रशिक्षकही आहेत. दरम्यान, याप्रकरणी सुनीलकुमार यांच्याशी संपर्क करण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच, सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, सुनील यांनी संघव्यवस्थापक सत्यदेव कुमार यांच्यासमक्ष आपली चूक मान्य केली. त्यांनी याप्रकरणी पत्राद्वारे सांगितले, ‘माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. यामुळे सर्वांना अडचणींना सामोरे जावे लागले. यासाठी मी सर्वांची माफी मागतो. मला येथून घरी पाठविण्यात येत असून मी सुरक्षितपणे घरी पोहोचेल.’ (वृत्तसंस्था)
या दुर्दैवी घटनेची अजून चौकशी होत आहे. जागतिक तिरंदाजी संघटना याप्रकरणी काहीही बोलण्यास अद्याप सक्षम नाही. स्पोटर््स अॅथॉरिटी आॅफ इंडिया (साई) याप्रकरणी हरियाना पोलिसांना पत्राद्वारे या प्रकरणाची माहिती देत आहे. याप्रकरणी सुनीलविरुद्ध कडक कारवाई करण्याची विनंती ‘साई’ हरियाना पोलिसांना करेल.
- ख्रिस वेल्स, जागतिक तिरंदाजी संघटना प्रतिनिधी