तिरंदाजी - दीपिकाकुमारी आणि बोंबायला उपउपांत्यपूर्व फेरीत
By admin | Published: August 11, 2016 05:44 AM2016-08-11T05:44:27+5:302016-08-11T05:44:27+5:30
भारतीय तिरंदाज लैशराम बोंबायलादेवी आणि दीपिका कुमारीने बुधवारी ऑलिम्पिकच्या महिला वैयक्तिक रिकर्व्ह गटात उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. ११ : भारतीय तिरंदाज लैशराम बोंबायलादेवी आणि दीपिका कुमारीने बुधवारी ऑलिम्पिकच्या महिला वैयक्तिक रिकर्व्ह गटात उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. 'राऊंड ऑफ ६४' च्या सामन्यात बोंबायलाने ऑस्ट्रियाच्या लॉरेन्स बेलडॉफवर ६-२ असा विजय साजरा तर दीपिका कुमारीने जॉर्जियाच्या क्रिस्टीनचा ६-४ ने पराभऴ केला. 'राऊंड ऑफ ६४' सामन्यातील विजयानंतर बोंबायला आणि दीपिका कुमारीने राऊंड ऑफ ३२ मध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना प्री कॉर्टर फायनल (उप उपांत्यपूर्व) फेरीत प्रवेश मिळवला आहे.
काही मिनिटांच्या फरकाने खेळविण्यात आलेल्या दोन्ही लढतीत बोंबायला आणि दीपिकाने उत्कृष्ट कामगिरीसह उपाउपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले आहे. 'राऊंड ऑफ ३२' च्या सामन्यात बोंबायला तैपेईची लिन शिह चियाचा ६-२ अशा फरकाने पराभव केला. तर दीपिकाकुमारीने इटलीच्या सार्तोरीचा ६-२ अशा फरकाने पराभव केला.
बोंबायलाने बेलडॉफविरुद्ध पहिला सेट गमाविल्यानंतर शानदार कामगिरीसह पुढील तिन्ही सेट जिंकले. पहिला सेट तिने २४-२७ ने गमाविला होता. नंतर मात्र २८-२४, २७-२३ आणि २६-२४ असे गुण नोंदविले. दुसऱ्या सेटमध्ये बोंबायलाने १०, ९, ९ तसेच तिसऱ्या सेटमध्ये ९, ९, ९ गुणांचा वेध घेतला. चौथ्या सेटमध्ये ९, ९ आणि ८ गुण नोंदविले. ऑस्ट्रियाच्या खेळाडूला पहिल्या सेटमधील कामगिरीची लय कायम राखण्यात मात्र अपयश आले.
बोंबायलाने दुसऱ्या सामन्यात तैपेईची चिया हिच्यावर २७-२४, २७-२४, २८-२६ असा विजय साजरा केला. बोंबायलाने चारही सेटमध्ये प्रत्येकी एकदा १० गुण नोंदवित कमाल केली. चियाने तिसऱ्या सेटमध्ये लागोपाठ दोनदा १० गुणांचा वेध घेताच चुरस निर्माण झाली होती. पण बोंबायलाने चौथ्या सेटमध्ये २८-२६ अशी दोन गुणांची आघाडी घेत पुढील फेरीत स्थान निश्चित केले.
राऊंड ऑफ ६४ दीपिकाकुमारीने पहिल्या सेटमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना २७-२६ असा विजय मिळवला. तर दुसरा सेट बरोबरीत सुटला. त्यांनतर तिसरा सेट ३० -२७ जिंकत सामन्यात वर्चस्व राखले. चौथ्या सेटमध्ये जॉर्जियाच्या क्रिस्टीनने दमदार पुनराग्मन करत दीपिकाकमुरीचा असा २९-२७ पराभव केला. पाचव्या सेटमध्ये दीपिकाने दमदार पुनराग्मन करत सामना टाय केला. जॉर्जियाच्या क्रिस्टीनचा पराभव करून भारताच्या दीपिका कुमारीचा राऊंड ३२ फेरीत प्रवेश केला.
राऊंड ऑफ ३२ च्या सामन्यात दीपिकाकुमारीला इटलीच्या सार्तोरी विरुद्ध पहिल्या सेटमध्ये २७-२४ असा पराभव पत्कारावा लागल्यानंतर शानदार कामगिरीसह पुढील ३ सेटमध्ये दमदार खेळाचे प्रदर्शन करत सलग ३ सेट जिंकले. राऊंड ऑफ ३२च्या सामन्यात दीपिकाने इटलीच्या सार्तोरीचा ६-२ अशा फरकाने पराभव करत उप उपांत्यापुर्व फेरीत प्रवेश केला आहे.