दणदणीत विजयासह अर्जेंटिना, चिली कोपा अमेरिकेच्या उपांत्य फेरीत
By admin | Published: June 19, 2016 03:28 PM2016-06-19T15:28:58+5:302016-06-19T15:28:58+5:30
लायोनेल मेसीच्या अप्रतिम खेळाच्या बळावर अर्जेंटिनाने वेनेझुएलावर ४-१ ने मात करत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.
Next
ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. १९ - लायोनेल मेसीच्या अप्रतिम खेळाच्या बळावर अर्जेंटिनाने वेनेझुएलावर ४-१ ने मात करत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला. उपांत्यफेरीत अर्जेंटिनाचा सामना अमेरिकेविरुद्ध होणार आहे. मेसीने ६० व्या मिनिटाला अर्जेंटिनासाठी तिसरा गोल केला.
मेसीचा स्पर्धेतील हा चौथा तर, आंतरराष्ट्रीय सामन्यातील ५४ वा गोल आहे. या गोलनंतर मेसीने आपल्याच देशाच्या गॅब्रियल बाटिसटुटा यांच्या ५४ आंतरराष्ट्रीय गोलच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. मेसीने आपल्या सहका-यांना गोल करण्याच्या संधी निर्माण करुन दिल्या.
गोंझालो हिग्युएनने आठ आणि २८ व्या मिनिटाला दोन गोल केले. अर्जेंटिनाने संपूर्ण सामन्यात वेनेझुएलाला डोक वर काढण्याची संधी दिली नाही. वेनेझुएलाकडून रॉनडॉनने ७० व्या मिनिटाला गोल केला. लामेलाने ७१ व्या मिनिटाला लगेच अर्जेंटिनासाठी चौथा गोल केला. त्यानंतर अर्जेंटिनाने आघाडी कायम ठेवत विजयाची नोंद केली.
वरगॅसचा धडाकेबाज खेळ, मेक्सिकोला नमवून चिली उपांत्यफेरीत
गत विजेत्या चिलीने इडयुरडो वरगॅसच्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर मॅक्सिकोला तब्बल ७-० ने नमवून दणक्यात उपांत्यफेरीत प्रवेश केला. वरगॅसने तीस मिनिटात चार गोल केले. मेक्सिकोचा १९७८ नंतर झालेला हा मोठा पराभव आहे. १९७८च्या वर्ल्डकपमध्ये पश्चिम जर्मनीने मेक्सिकोवर ६-० ने विजय मिळवला होता.