अर्जेंटिना हॉकीत प्रथमच अजिंक्य
By admin | Published: August 19, 2016 11:01 PM2016-08-19T23:01:07+5:302016-08-19T23:01:07+5:30
अर्जेंटिनाने रिओ आॅलिम्पिकच्या अटीतटीच्या फायनल लढतीत बेल्जियमचा ४-२ असा पराभव करीत आॅलिम्पिक इतिहासात प्रथमच हॉकीत सुवर्णपदक जिंकले.
अंतिम सामना : बेल्जियमवर ४-२ ने मात
रिओ : अर्जेंटिनाने रिओ आॅलिम्पिकच्या अटीतटीच्या फायनल लढतीत बेल्जियमचा ४-२ असा पराभव करीत आॅलिम्पिक इतिहासात प्रथमच हॉकीत सुवर्णपदक जिंकले.
रिओ आॅलिम्पिकमध्ये अर्जेंटिनाला फक्त भारताकडूनच पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर या संघाने शानदार कामगिरी करताना गत चॅम्पियन जर्मनीचे आव्हान ५-२ ने उद्ध्वस्त करताना अंतिम फेरीत धडक मारली होती, तर बेल्जियमने अंतिम फेरीत धडक मारण्याआधी जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावरील हॉलंड संघावर ३-१ अशी मात केली होती.
याआधी अर्जेंटिनाचा संघ कधीही आॅलिम्पिकच्या उपांत्य फेरी अथवा अंतिम फेरीत पोहोचू शकला नव्हता. यावेळेस मात्र त्यांनी रिओ आॅलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारतानाच सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला.
गुरुवारी डिओडोरो सेंटरमध्ये झालेल्या सुवर्णपदक लढतीत बेल्जियमचा फॉरवर्ड तांगुय कोसिन याने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करीत आपल्या संघाचे गोलचे खाते उघडले. तथापि, बेल्जियमची ही आघाडी फार काळ टिकू शकली नाही आणि अर्जेंटिनाचा कर्णधार इबारा पेड्रोने शानदार गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. तीनच मिनिटांनंतर अर्जेंटिनाच्या इग्नेसियो ओर्टिजने आणखी एक गोल करीत ही आघाडी २-१ अशी केली. अर्जेंटिना संघ पहिल्या क्वॉर्टरपर्यंत २-१ ने आघाडीवर होता.
दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये अर्जेंटिनाने आक्रमक खेळ करताना ३-१ अशी आघाडी केली. हा गोल सामन्याच्या २१ व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा डिफेंडर पिलट गोंजालो याने केला. १-३ ने पिछाडीवर पडल्यानंतर बेल्जियमने तिसऱ्या क्वॉर्टरच्या ४४ व्या मिनिटाला गॉथियर बोकार्डच्या शानदार गोलच्या बळावर २-१ अशी आघाडी कमी केली.
चौथ्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांत रोमहर्षक लढत पाहायला मिळाली आणि दोन्ही संघाने गोल करण्याच्या अनेक वेळा संधी निर्माण केली; परंतु अखेर अर्जेंटिनाने बाजी मारली. त्यांचा फॉरवर्ड माजिली अगस्टिन याने सामना संपण्यास काही सेकंद बाकी असताना ५९ व्या मिनिटाला गोल करीत स्कोअर ४-२ असा केला आणि आपल्या संघाला आॅलिम्पिक इतिहासात हॉकीतील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. बेल्जियमला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कास्यपदकाच्या लढतीत जर्मनीने हॉलंडचा ४-३ असा पराभव करीत कास्यपदक जिंकले.