अर्जेंटिना सहाव्या स्थानी; वर्ल्डकप प्रवेश धोक्यात
By admin | Published: November 12, 2016 01:36 AM2016-11-12T01:36:58+5:302016-11-12T01:36:58+5:30
विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत ब्राझीलने अर्जेंटिनाच्या विश्वचषकात पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का दिला आहे
साओ पाउलो : विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत ब्राझीलने अर्जेंटिनाच्या विश्वचषकात पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का दिला आहे. १० संघांच्या दक्षिण अमेरिकी पात्रता फेरीत ब्राझीलने अर्जेंटिनावर ३-०ने विजय मिळविला. यामुळे या गटात अर्जेंटिना सहाव्या क्रमांकावर आहे.
ब्राझीलच्या फिलीप कोटिन्हो आणि नेमार यांनी पहिल्या हाफमध्ये दोन गोल केले, तर पोलिन्होने ५८व्या मिनिटाला तिसरा गोल केला. अर्जेंटिनाचा हा चौथा पराभव आहे. यासोबत ब्राझील ११ सामन्यांत २४ गुणांसह अग्रस्थानी आहे, तर अर्जेंटिना १६ गुणांसह सहाव्या स्थानी आहे.
ग्रुपमधील अव्वल चार संघच रशियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरतील, तर पाचव्या स्थानावरील संघ प्लेआॅफमध्ये ओसनिया ग्रुपच्या विजेत्या संघाशी लढेल. दुखापतीमुळे तीन सामन्यांत बाहेर असलेला मेस्सी यावेळी फार काही करू शकला नाही. ब्राझीलने २४ व्या मिनिटाला आघाडी घेतली. नेमारच्या पासवर कोटिन्होने गोल केला. त्यानंतर मिळालेल्या पेनल्टीवर नेमारने गोल करत ब्राझीलला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पोलिन्होने १३ मिनिटांनंतर लगेचच रेनाटो आॅगस्टोच्या क्रॉसवर तिसरा गोल केला.
अन्य सामन्यांत पेरूने दुसऱ्या हाफमध्ये चार गोल करत पॅराग्वेला ४-१ ने पराभूत केले, तर जोसेफ मार्टिनेजच्या हॅटट्रिकच्या बळावर व्हेनेजुएलाने बोलिवियाला ५-० असे पराभूत केले. (वृत्तसंस्था)