अर्जेंटिनाची विजयी किक, पोलंडला नमवून बाद फेरीत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 05:25 AM2022-12-02T05:25:04+5:302022-12-02T05:30:05+5:30
पोलंडला नमवून बाद फेरीत प्रवेश
दोहा : यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सलामी लढतीत सौदी अरब संघाकडून धक्कादायक पराभव झालेल्या अर्जेंटिनाने जबरदस्त पुनरागमन केले. शानदार खेळाच्या जोरावर सलग दोन सामने जिंकताना अर्जेंटिनाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘क’ गटात अव्वल स्थान पटकाविले. बुधवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने पोलंडला २-० असे नमवले.
पराभवानंतरही पोलंडने सरस गोल अंतराच्या जोरावर मेक्सिकोला मागे टाकत बाद फेरी गाठली. ॲलेक्सिस मॅक ॲलिस्टरने ४६ व्या मिनिटाला, तर ज्युलियन अल्वारेजने ६७व्या मिनिटाला गोल करत अर्जेंटिनाला विजयी केले. पहिल्या सत्रात बरोबरी राहिल्यानंतर अर्जेंटिनाने आक्रमक खेळ केला. बाद फेरीत अर्जेंटिनाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल. पहिल्या सत्रात मेस्सीकडून हुकलेली पेनल्टी की चर्चेचा विषय ठरली. गोलरक्षक बोजसिएचश्जेस्नी याचा हात चुकून मेस्सीच्या चेहऱ्याला लागला होता.
अर्जेटिनाला पेनल्टी किक बहाल झाली. मात्र, या संधीचा फायदा घेण्यात खुद्द मेस्सीला अपयश आले. ६७ व्या मिनिटाला अचूक अंदाज लावत वोजसिएचने ही पेनल्टी किक यशस्वीपणे रोखली. त्यामुळेच पेनल्टी किक हुकल्यानंतरही आपला संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरल्याचा सर्वाधिक आनंद मेस्सीला झाला. बाद फेरीत प्रवेश केलेल्या पोलंडला आता गतविजेत्या फ्रान्सच्या तगड्या आव्हानाला सामोरे जायचे आहे.
१९८६ सालानंतर पहिल्यांदाच पोलंडने विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला.
सलग पाचव्यांदा अर्जेंटिनाने विश्वचषक स्पर्धेची बाद फेरी गाठली.
ॲलेक्सिस आणि ज्युलियन दोघांनीही विश्वचषक स्पर्धेत पहिला वैयक्तिक गोल नोंदविला.