अर्जेंटिनाला फायनलमध्ये ‘तिखट’ आव्हान
By admin | Published: June 24, 2016 01:15 AM2016-06-24T01:15:01+5:302016-06-24T01:15:01+5:30
गत चॅम्पियन चिलीने पूर्वार्धात केलेल्या दोन जबरदस्त गोलच्या जोरावर पावसामुळे बाधित झालेल्या सेमीफायनलमध्ये कोलंबियाला २-० ने हरवून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम
शिकागो : गत चॅम्पियन चिलीने पूर्वार्धात केलेल्या दोन जबरदस्त गोलच्या जोरावर पावसामुळे बाधित झालेल्या सेमीफायनलमध्ये कोलंबियाला २-० ने हरवून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत चिलीसमारे सलग दुसऱ्यांदा अर्जेंटिनाशी भिडावे लागेल. रविवारी न्यू जर्सी येथील ईस्ट रुदरफोर्ड मैदानावर या दोन बलाढ्य संघांमध्ये अमेरिका खंडाचा बादशाह बनण्यासाठी झुंज रंगणार आहे.
तत्पूर्वी, अर्जेंटिनाने यजमान अमेरिकेला ४-० ने एकतर्फी हरवून अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्यांदा चिली आणि अर्जेंटिना कोपा अमेरिका स्पर्धेच्या किताबासाठी अंतिम फेरीत झुंजणार आहेत. गेल्या वेळी चिलीने अर्जेंटिनाला ४-१ असे हरवून अजिंक्यपद मिळविले होते.
एरानगुएजचा पहिला धमाका
चिलीचा मिडफिल्डर चार्ल्स एरानगुएजने सातव्या मिनिटाला पहिला गोल ठोकून १-० अशी आघाडी मिळवून दिली. कोलंबियाचा मिडफिल्डर कुआड्राडो याचा भरकटलेला हेडर थेट एरानगुएज याच्याजवळ पोहोचला. त्याने या संधीचा फायदा उठवून कोलंबियाचा उपकर्णधार आणि गोलकीपर डेव्हिड ओसपिना याला चकवून गोल डागला.
यानंतर ११व्या मिनिटाला जोस पेड्रो फ्युनजालिदाने दुसरा गोल नोंदवून आघाडी २-० अशी केली. गोलपोस्टला धडकून परत आलेल्या चेंडूला पेड्रोने चपळाईने पुन्हा गोलपोस्टमध्ये धाडले. यामुळे कोलंबिया प्रचंड दबावाखाली आला. त्यानंतर उत्तरार्धात पावसामुळे खेळ दोन तासांसाठी थांबविण्यात आला.
पाऊस थांबल्यानंतर दोन्ही संघ पुन्हा मैदानात उतरले. परंतु, ०-२ ने पिछाडीवर पडलेल्या कोलंबियन संघाला फारशी करामत दाखवता आली नाही. ५६व्या मिनिटाला कोलंबिया संघाला गोल करण्याची संधी होती; परंतु त्यांना ती साधता आली नाही.
मिडफिल्डर आर्टुरो विडाल
आणि मार्सेलो डियाज या दोन खेळाडूंशिवाय मैदानात उतरलेल्या चिलीला अर्ध्या तासानंतर पेड्रो हर्नांडिस जखमी झाल्याने आणखी एका खेळाडूला मुकावे लागले. कोलंबियाकडून जेम्स रॉड्रिग्जच्या दोन चांगल्या प्रयत्नांना गोलमध्ये रूपांतरित करता न आल्याने त्यांचा गोलफलक कोराच राहिला.
कोलंबियाला आता तिसऱ्या स्थानासाठी प्लेआॅफ लढतीत अमेरिकेशी शनिवारी लढावे
लागेल. (वृत्तसंस्था)