अर्ध मॅरेथॉनमध्ये सेनादलाचे वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 02:44 AM2019-01-21T02:44:54+5:302019-01-21T02:45:32+5:30
भारतीय रेल्वेच्या मीनू प्रजापती हिने १ तास १८ मिनिटे ५ सेकंदांची वेळ देत २१ किमी अंतराची मुंबई अर्ध मॅरेथॉन जिंकली.
मुंबई : भारतीय रेल्वेच्या मीनू प्रजापती हिने १ तास १८ मिनिटे ५ सेकंदांची वेळ देत २१ किमी अंतराची मुंबई अर्ध मॅरेथॉन जिंकली. त्याचवेळी पुरुष गटामध्ये सेनादलाचा दबदबा राहिला. श्रीनू बुगाथा आणि शंकरमन थापा या सेनादलाच्या धावपटूंनी पहिल्या दोन क्रमांकांवर कब्जा केला, तर मूळचा महाराष्ट्राचा मात्र एलआयसीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कालिदास हिरवेला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
रविवारी पहाटे ५.३० वाजता वरळी डेअरी येथून सुरू झालेल्या अर्ध मॅरेथॉनच्या महिला गटात सुरुवातीपासून घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवत रेल्वेच्या मीनूने सुवर्ण पदकावर नाव कोरले. तिला मुंबई पोलीसच्या साईगीता नाईककडून कडवी लढत मिळाली. मात्र अनुभवात कमी पडल्याने मीनूला गाठण्यात तिला अखेरपर्यंत अपयश आले. त्यामुळे साईगीताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. रेल्वेच्याच मंजू यादवने कांस्य जिंकले. मीनूने १:१८:०५ अशी वेळ नोंदवत सुवर्ण पटकावले. साईगीता (१:१९:०१) व मंजू (१:२५:११) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य जिंकले. पहिल्यांदाच मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या साईगीताने रौप्य मिळवत लक्ष वेधले.
पुरुषांमध्ये सेनादलाच्या धावपटूंनी बाजी मारली. या वेळी मराठमोळ्या कालिदास हिरवेची सुवर्ण संधी स्नायू ताणल्याने हुकली. शानदार सुरुवात केलेल्या कालिदासने १५ किमीपर्यंत आघाडी घेतली होती. या वेळी सुवर्ण तोच पटकावणार असे चित्र होते. मात्र स्नायू ताणले गेल्याने तो काही वेळ थांबल्याने श्रीनू व शंकरमन पुढे गेले. मात्र तरीही कालिदासने हार न मानता अव्वल तीनमध्ये स्थान मिळवले. श्रीनूने १:०५:४९ अशा वेळेसह सुवर्ण, तर शंकरमनने १:०६:०७ वेळेसह रौप्य जिंकले. कालिदासने १:०६:३८ वेळेसह कांस्य पदक जिंकले.
>मी पहिल्यांदाच मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. दरवेळी राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धा पात्रता स्पर्धेमुळे मला मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होता येत नव्हतं. यंदा पदक मिळवून ही कसर दूर केल्याचा आनंद आहे. फेब्रुवारीमध्ये खुली राष्ट्रीय स्पर्धा असून त्यात वर्चस्व गाजवण्याचे लक्ष्य आहे.
- साईगीता नाईक