भारताविरुद्ध बलाढ्य स्पेनचे आगमन
By admin | Published: September 13, 2016 03:40 AM2016-09-13T03:40:49+5:302016-09-13T03:40:49+5:30
भारताला पराभूत करण्यासाठी आपल्या सर्वोत्तम खेळाडूंची आवश्यकता नसतानाही स्पेनने विश्व ग्रुप डेव्हिस चषक प्लेआॅफचा सामा गांभीर्याने घेतला आहे
नवी दिल्ली : भारताला पराभूत करण्यासाठी आपल्या सर्वोत्तम खेळाडूंची आवश्यकता नसतानाही स्पेनने विश्व ग्रुप डेव्हिस चषक प्लेआॅफचा सामा गांभीर्याने घेतला आहे आणि त्यामुळेच त्यांनी खूप कमी रँकिंगच्या भारतीय खेळाडूंविरुद्ध २० सदस्यीय बलाढ्य संघ (नवी दिल्ली) येथे पाठवला आहे.
जागतिक क्रमवारीतील चौथ्या मानांकित राफेल नदालच्या नेतृत्वाखालील स्पॅनिश संघ आज येथे पोहोचला आणि त्यांनी सायंकाळी कोर्टवर सरावदेखील केला.
नदाल आणि डेव्हिड फेरर यांनी दीड तास कसून सराव केला. त्यांचा सराव पाहता भारताला पराभूत करण्यासाठी त्यांना फारसे परिश्रम करण्याची गरज भासणार नाही.
ते सफाईने आणि वेगाने चेंडू हिट करीत होते. त्यामुळे साकेत मिनेनी (विश्व रँकिंग १३७) आणि रामकुमार रामनाथन (२०३) यांचा त्यांच्यासमोर टिकाव लागणे खूपच कठीण आहे. तथापि, या खेळाडूंविरुद्ध खेळताना भारतीयांना नक्कीच अनुभव मिळणार आहे. कोर्टवर दव आहे; परंतु टेनिससाठी चांगले असल्याचे नदालने सांगितले. स्पेन पूर्ण तयारीनिशी उतरण्याविषयी नदाल म्हणाला, ‘‘मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे आणि ही विशेष प्रेरणा आहे. जेव्हा तुम्ही स्वदेशात खेळत नसता तेव्हा समस्या येते. भारताचा संघ चांगला असून लढत संघर्षपूर्ण होईल. ते घरच्या प्रेक्षकांसमोर खेळतील. आमच्याकडे अव्वल १०० मधील काही चांगले खेळाडू आहेत आणि ते विश्व ग्रुपमध्ये नसणे याची खंत आम्हाला आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळवण्याकडे लक्ष देत आहोत आणि येथे जिंकण्याची शक्यता आहे. तथापि, हे एवढे सोपे नाही. आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.’’(वृत्तसंस्था)