दीपा कर्माकरची दुखापत बळावली, 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभागावर सावट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 06:48 PM2019-03-16T18:48:11+5:302019-03-16T18:48:34+5:30
भारताची आघाडीची जिमनॅस्ट दीपा कर्माकरच्या 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याच्या स्वप्नांना सुरूंग लागण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
मुंबई : भारताची आघाडीची जिमनॅस्ट दीपा कर्माकरच्या 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याच्या स्वप्नांना सुरूंग लागण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. आर्टिस्टीक जिमनॅस्टीक वर्ल्ड कप स्पर्धेतील व्हॉल्ट प्रकाराच्या अंतिम फेरीत तिच्या गुडघ्याची दुखापतीनं डोकं वर काढलं. त्यामुळे तिला पुढील आठवड्यात दोहा येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.
25 वर्षीय दीपानं हॅण्डफ्रंट 540 व्हॉल्ट प्रकाराच्या पात्रता फेरीत अनुक्रमे 14.466 व 14.133 गुणांची कमाई करताना सरासरी 14.299 गुणांसह तिसरा क्रमांक पटकावताना अंतिम फेरीत स्थान पटकावले होते. मात्र, अंतिम फेरीत व्हॉल्ट प्रकारात उडी गेताना तिची गुडघ्याची दुखापत बळावली. ''अंतिम फेरीपूर्वी तिचा गुडघा दुखू लागला होता. तिने अंतिम फेरीत प्रयत्न केला, परंतु तिला यश प्राप्त झाले नाही. दुखापतीमुळे तिनं दुसरा प्रयत्न केला नाही आणि त्यामुळे तिचे आव्हान संपुष्टात आले. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेतूनही तिनं माघार घेतली आहे. आता आगामी आशियाई व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीनं ती तयारी करणार आहे,'' असे जिमनॅस्टीक फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष रियाज भाटी यांनी सांगितले.
टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेच्या दृष्टीने दोन वर्ल्ड कप स्पर्धा महत्त्वाच्या होत्या. यातून आठ जणांना पात्रता मिळवण्याची संधी होती, परंतु दीपाला आता यात सहभाग घेता येणार नाही. 13 ते 16 जून या कालावधीत आशियाई अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे, तर 4 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत जागतिक स्पर्धा होईल. जागतिक स्पर्धेतून दीपाला ऑलिम्पिक प्रवेश मिळवता येणार आहे.
गतवर्षी जर्मनीत झालेल्या आर्टिस्टीक जिमनॅस्ट वर्ल्ड कप स्पर्धेत दीपानं कांस्यपदक जिंकले होते. गुडघ्यावर शस्त्रक्रीया झाल्यानंतर दीपानं पहिल्याच स्पर्धेत पदक जिंकून अपेक्षा उंचावल्या होत्या. 2016 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर ती दुखापतीमुळे स्पर्धेबाहेरच होती. जुलै महिन्यात तिनं वर्ल्ड चॅलेंज स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली.