अरुण यांच्यामुळे चुका सुधारण्यास मदत झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:22 AM2017-07-19T00:22:22+5:302017-07-19T00:22:22+5:30
माझ्या वेगवान माऱ्यात काही उणिवा होत्या. गोलंदाज कोच भरत अरुण यांनी स्वत:च्या पहिल्या कार्यकाळात या उणिवा दूर करण्यास मदत केली, असे मत वेगवान
नवी दिल्ली : माझ्या वेगवान माऱ्यात काही उणिवा होत्या. गोलंदाज कोच भरत अरुण यांनी स्वत:च्या पहिल्या कार्यकाळात या उणिवा दूर करण्यास मदत केली, असे मत वेगवान गोलंदाज उमेश यादव याने व्यक्त केले.
मुख्य कोच रवी शास्त्री यांच्या पसंतीनुसार अरुण यांना टीम इंडियासोबत गोलंदाजी कोच म्हणून दुसरा कार्यकाल बहाल करण्यात आला आहे. ते पुढील दोन वर्षे संघासोबत असतील. या पार्श्वभूमीवर स्थानिक कसोटी सत्रात सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या उमेशने यशाचे श्रेय अरुण यांच्या परिश्रमांना दिले.
एका मुलाखतीत उमेश म्हणाला, ‘मागचे सत्र कसोटी क्रिकेटमध्ये माझ्यासाठी ‘लकी’ ठरले. मी सातत्यपूर्ण मारा केला. या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी मला अरुण यांनी प्रोत्साहन देत चुका सुधारण्यास मदत केली. या यशाचे श्रेय त्यांनादेखील जाते.’
उमेशने आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १७ गडी बाद केले. चार कसोटी सामन्यांत कुठल्याही वेगवान भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी उमेश मानसिक तयारी करीत आहे. सरावात उमेश ‘एसजी’ऐवजी ‘कुकाबुरा’ चेंडूने गोलंदाजी करीत आहे. पाटा खेळपट्ट्यांवर कुकाबुरा चेंडू आव्हानात्मक असतो, असे सांगून उमेश म्हणाला, ‘कुकाबुरा चेंडू २५ षटकांनंतर चांगलाच जुना होतो. लाल कुकाबुरा चेंडूने पहिल्या १५ षटकांत बळी घेता येतात. तथापि चेंडूचे
सीम थोडे घासले गेल्यास पाटा खेळपट्टीवर हा चेंडू अधिक आव्हानात्मक बनतो.’ (वृत्तसंस्था)
मी संघात असताना कधी आत, तर कधी बाहेर बसत होतो. या काळात गोलंदाजीतील उणिवा शोधल्या आणि त्या दूर केल्यामुळे चांगले निकाल पाहायला मिळाले. अंतिम एकादशमध्ये नसायचो त्या वेळी अरुण नेट्समध्ये माझ्यासोबत तासन्तास वेळ घालवित होते.
नागपुरात वास्तव्यास असायचो तेव्हा हेच काम माजी वेगवान गोलंदाज सुब्रतो बॅनर्जी करीत असत. दोघांनीही माझे तंत्र सुधारण्यावर परिश्रम घेतल्याने मी दोघांचाही सदैव ऋणी असल्याचे उमेशने
सांगितले.