आशिष नेहरा की मोहम्मद शमी?
By admin | Published: April 24, 2017 12:55 AM2017-04-24T00:55:21+5:302017-04-24T00:55:21+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी संघाची निवड करण्यासाठी भारतीय निवड समितीची ज्या वेळी बैठक होईल, त्या वेळी गोलंदाजांची
नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी संघाची निवड करण्यासाठी भारतीय निवड समितीची ज्या वेळी बैठक होईल, त्या वेळी गोलंदाजांची निवड ही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. चौथ्या वेगवान गोलंदाजाच्या स्थानासाठी आशिष नेहरा व मोहम्मद शमी हे दोघेही दावेदार आहेत.
आयसीसीने ब्रिटनमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १५ सदस्यांच्या संघाची निवड करण्यासाठी २५ एप्रिल ही अखेरची मुदत दिली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये संघाची निवड होणार असल्याचे निश्चित आहे.
निवड समितीच्या बैठकीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. कारण मिळकतीमध्ये भागीदारी व प्रशासन या आयसीसीसोबत जुळलेल्या मुद्यावर तोडगा निघावा, असे बीसीसीआयचे मत आहे.
रविचंद्रन आश्विन आगामी काही आठवड्यांमध्ये सरावाला सुरुवात करेल, अशी आशा आहे. त्याची व रवींद्र जडेजाची फिरकीपटू म्हणून निवड होणार असल्याचे निश्चित आहे, पण चौथ्या वेगवान गोलंदाजाच्या निवडीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. भारतीय संघ ब्रिटनमध्ये दाखल झाल्यानंतर दोन सराव सामने खेळणार आहे. आश्विनला त्या वेळी सरावाची संधी मिळणार आहे. वेगवान गोलंदाजीमध्ये डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह, स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार व वेगाचा बादशाह उमेश यादव हे फिट असतील, तर १५ सदस्यांच्या संघात निवड पक्की मानली जात आहे. त्याचप्रमाणे हार्दिक पांड्याची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड होणे निश्चित आहे. अशा स्थितीत वेगवान गोलंदाजाची एक जागा रिक्त आहे. त्यासाठी मोहम्मद शमी व आशिष नेहरा दावेदार आहेत. (वृत्तसंस्था)