आश्विन ठरला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू
By admin | Published: May 25, 2017 01:21 AM2017-05-25T01:21:55+5:302017-05-25T01:21:55+5:30
भेदक फिरकी आणि निर्णायक फलंदाजी अशा अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारताच्या अनेक विजयांत मोलाचे योगदान
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भेदक फिरकी आणि निर्णायक फलंदाजी अशा अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारताच्या अनेक विजयांत मोलाचे योगदान दिलेल्या स्टार क्रिकेटपटू रविचंद्रन आश्विन याला सीएट क्रिकेट रेटिंगच्या (सीसीआर) सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर आणि आरपीजीचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांच्या हस्ते आश्विनला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यंदाच्या मोसमात भारताने घरच्या मैदानावर १३ कसोटी सामने खेळले आणि यामध्ये आश्विनने प्रतिस्पर्धी संघांना आपल्या तालावर नाचवले. या दीर्घ मोसमामध्ये टीम इंडियाने न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि आॅस्टे्रलियाविरुद्ध १३ सामन्यांपैकी १० सामन्यांत बाजी मारली. विशेष म्हणजे आश्विनने गेल्या १२ महिन्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी करताना ९९ बळी घेण्याचा पराक्रम केला.
त्याचप्रमाणे, या वेळी युवा फलंदाज शुभम गिलला वर्षातील सर्वोत्तम युवा खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबईत इंग्लंडविरुद्ध झालेल्या १९ वर्षांखालील एकदिवसीय मालिकेत केलेल्या चमकदार कामगिरीमुळे
या पुरस्कारासाठी गिलची निवड झाली.
दरम्यान, या वेळी आश्विनने जुन्या आठवणींना उजाळा देताना, आपण पहिली आॅटोग्राफ गावसकर यांचीच घेतली होती, असे सांगितले. तसेच, नुकताच झालेल्या आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंटकडून चमक दाखवलेल्या वॉशिंग्टन सुंदरचेही आश्विनने कौतुक केले.
रैना-आश्विनची धमाल
या पुरस्कार सोहळ्यात सुरेश रैना व आश्विन यांच्यासह रंगलेल्या रॅपिड फायर राऊंडने धमाल उडवली. या वेळी ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक अयाझ मेमन यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत रैना व आश्विनने टीम इंडियाच्या शिलेदारांची मजेशीर माहिती दिली.