आश्विन गोलंदाजीतील डॉन ब्रॅडमन - स्टीव्ह वॉ
By admin | Published: February 15, 2017 12:33 AM2017-02-15T00:33:16+5:302017-02-15T00:33:16+5:30
आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनवर स्तुतिसुमने उधळली आहेत. अश्विनला त्याने ‘गोलंदाजीतील ब्रॅडमन’
मोनाको : आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनवर स्तुतिसुमने उधळली आहेत. अश्विनला त्याने ‘गोलंदाजीतील ब्रॅडमन’ संबोधले आहे. आगामी कसोटी मालिकेत अश्विनचा मारा कसा खेळायचा, याचे उत्तर आॅस्ट्रेलियन संघाला शोधावे लागेल, असेही वॉ म्हणाला.
वॉ म्हणाला,‘आॅस्ट्रेलियाला दडपणाखाली मनोधैर्य खचणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. अश्विन गोलंदाजीमध्ये ब्रॅडमन आहे. तो दिग्गज खेळाडू आहे. अश्विनच्या गोलंदाजीला यशस्वीपणे सामोरे जाण्याचा मंत्र सापडला तर आॅस्ट्रेलियाला या मालिकेत संधी राहील.’
भारतीय फिरकीपटूची प्रशंसा करताना वॉ म्हणाला,‘अश्विनची सध्याची कामगिरी बघता तो भविष्यात अनेक विक्रम नोंदविणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अश्विनची आकडेवारी शानदार आहे.’
आॅस्ट्रेलियापुढे कडवे आव्हान
वॉ म्हणाला, आॅस्ट्रेलियासाठी ही मालिका खडतर ठरणार आहे. कारण भारताचा संघ समतोल असून कोहलीचे नेतृत्व शानदार आहे. भारतीय संघ सध्या चांगला खेळ करीत आहे. सर्व खेळाडू आपली भूमिका चोख बजावत असून ते मायदेशात खेळत आहेत. भारताला भारतात पराभूत करणे कठीण असून गेल्या काही वर्षांत त्याची प्रचिती आली आहे. विराट चांगले नेतृत्व करीत असून खेळाडू सकारात्मक आहेत.’
(वृत्तसंस्था)
सौरवचे मत चुकीचे
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारतीय संघ आॅस्ट्रेलियाला ४-० ने धूळ चारेल असे भाकीत वर्तविले आहे. वॉच्या मते आॅस्ट्रेलिया संघाला कमी लेखणे चुकीचे ठरेल.
वॉ म्हणाला,‘आॅस्ट्रेलिया तुल्यबळ संघ असून भारतीय संघाची परीक्षा घेण्यास सक्षम आहे. संघातील अनेक खेळाडूंची भारतीय संघाला माहिती नाही. त्याचा आॅस्ट्रेलियाला लाभ मिळेल. पहिला कसोटी सामना महत्त्वाचा ठरले. आॅस्ट्रेलिया संघ चांगली सुरुवात करण्यात यशस्वी ठरला तर काहीही घडू शकते.’
विदेशात आॅस्ट्रेलिया संघाची कामगिरी निराशाजनक का होत आहे, हे न उलगडणारे कोडे आहे. हा जागतिक खेळ आहे. तटस्थ पंच असतात. विदेशात निराशाजनक कामगिरीचे कारण कळले नाही. कदाचित नकारात्मक मानसिकता यासाठी कारणीभूत असावी, असेही वॉ म्हणाला.