आयसीसी क्रमवारीत अश्विन-जडेजाने रचला इतिहास, दोघंही अव्वल
By admin | Published: March 8, 2017 02:49 PM2017-03-08T14:49:01+5:302017-03-08T14:53:39+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जारी केलेल्या कसोटी क्रमवारीमध्ये भारताच्या फिरकी जोडीने इतिहास रचला
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जारी केलेल्या कसोटी क्रमवारीमध्ये भारताच्या फिरकी जोडीने इतिहास रचला आहे. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा या दोघांनीही आयसीसीच्या क्रमवारीत संयुक्तरित्या अव्वल स्थान काबिज केलं आहे. आयसीसी क्रमवारीत दोन्ही फिरकी गोलंदाजांनी सारखे गुण मिळवून अव्वल स्थान गाठण्याची ही पहिलीच वेळ ठरली. आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा दोघांनाही 892 रेटिंग मिळाले आहेत. त्यांच्या खालोखाल ऑस्ट्रेलियाचा जॉश हेझलवूड (863) आणि त्यानंतर श्रीलंकेचा रंगना हेराथ (827) आहे. बंगळुरूमध्ये झालेल्या दुस-या कसोटीत अश्विनने 8 विकेट घेतल्या होत्या तर जडेजाने 7 विकेट घेतल्या होत्या.
यापुर्वी एप्रिल 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन आणि मुथय्या मुरलीधरन संयुक्तरित्या एक नंबरवर होते. पण दोन फिरकी गोलंदाजांनी संयुक्तरित्या अव्वल स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
मात्र, फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीला कांगारूंविरूद्धच्या दोन सामन्यात लवकर बाद होण्याचा फटका बसला. दुस-या स्थावरून तिस-या स्थानावर त्याची घसरण झाली. ऑस्ट्रेलियाचा स्मिथ या क्रमवारीत अव्वल आहे तर त्याच्याखाली न्यूझीलंडच्या केन विल्यमसनचा नंबर आहे.
दुसरीकडे, अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत आर.अश्विनची एका स्थानाने घसरण होऊन तो दुस-या क्रमांकावर आला आहे. बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनने पहिलं स्थान मिळवलं असून त्याचे 441 रेटिंग आहेत.