अश्विनमुळे आमच्यापुढे नवा पर्याय - संजय बांगर
By admin | Published: August 10, 2016 08:49 PM2016-08-10T20:49:26+5:302016-08-10T20:49:26+5:30
अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने केलेल्या शानदार फलंदाजीमुळे भारतीय संघाला सुरवातीच्या धक्क्यानंतर सावरण्यात यश आले. तसेच त्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना केलेल्या
ऑनलाइन लोकमत
ग्रास आइलेट, दि.10 - अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने केलेल्या शानदार फलंदाजीमुळे भारतीय संघाला सुरवातीच्या धक्क्यानंतर सावरण्यात यश आले. तसेच त्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना केलेल्या सतत्यामुळे फलंदाजी व्यवस्थापनाकडे नवा पर्याय उलबध्द झाला आहे, अशा शब्दांत भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी अश्विनचे कौतुक केले.
पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवताना अश्विनने प्रतिकूल परिस्थितीतून टीम इंडियाला सावरण्यात मोलाचे योगदान दिले. आघाडीची फळी कोसळल्यानंतर अश्विनने पहिल्या दिवसअखेर नाबाद ७५ धावांची मजबूत खेळी केली. भारताचा अर्धा संघ १२६ धावांत गारद झाल्यानंतर अश्विनने यष्टीरक्षक वृध्दिमान साहसह उपयुक्त नाबाद शतकी भागीदारी करुन संघाला सावरले.
बांगर यांनी सांगितले की, ‘‘सहाव्या क्रमांकावर अश्विनची ही तिसरी खेळी आहे. या मालिकेआधी त्याने कधीही या क्रमांकावर फलंदाजी केलेली नाही. त्याच्यामध्ये फलंदाजी करण्याची पुरेपुर क्षमता असल्याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, त्याला अशी अप्रतिम खेळी सहाव्या क्रमांकावर करताना पाहिले नव्हते. त्याचबरोबर एक सलामी फलंदाज म्हणूनही त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केल्याची माहिती आम्हाला आहे.’’
त्याचप्रमाणे, ‘‘अश्विनच्या या शानदार खेळीमुळे आमच्यापुढे अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे खालच्या फळीतील फलंदाज ज्याप्रकारे योगदान देत आहेत, त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघाचा आत्मविश्वास वाढत आहे,’’ असेही बांगर यांनी सांगितले. शिवाय बांगर यांनी यावेळी अश्विनला चांगली साथ देणाºया झुंजार वृद्धिमान साहाच्या खेळीचेही कौतुक केले. (वृत्तसंस्था)