आशिया चषक टी-२० फायनल आज : आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ सज्ज
By admin | Published: March 6, 2016 03:10 AM2016-03-06T03:10:36+5:302016-03-06T03:10:36+5:30
विजयाच्या लाटेवर स्वार झालेला भारतीय संघ आशिया चषक टी-२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज रविवारी यजमान बांगलादेशविरुद्ध सावध राहून जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याच्या इराद्याने उतरणार आहे.
मीरपूर : विजयाच्या लाटेवर स्वार झालेला भारतीय संघ आशिया चषक टी-२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज रविवारी यजमान बांगलादेशविरुद्ध सावध राहून जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याच्या इराद्याने उतरणार आहे.
दुसरीकडे बांगलादेश संघाने दिग्गजांना पाणी पाजून अंतिम फेरी गाठल्याने त्यांना कमी लेखणे घोडचूक ठरेल, याची जाणीव आत्मविश्वासाने सज्ज असलेल्या भारताला आहेच. कागदावर भारतीय संघ बलाढ्य दिसतो. आयसीसी क्रमवारीतही अव्वल स्थानावर आहे. बांगलादेश दहाव्या स्थानावर असला, तरी झटपट क्रिकेटमध्ये याचे महत्त्व कमीच आहे, कारण एका षटकात सामन्याचे चित्र पालटू शकते.
जेतेपदाच्या सामन्यात अटीतटीची झुंज पाहायला मिळेल. दोन्ही संघांत युवा आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा असल्याने रोमहर्षक खेळ अनुभवण्याची संधी मिळेल, यात शंका नाही. बांगला देशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान स्नायू दुखावल्यामुळे या सामन्यात खेळणार नाही.
आशिया चषक जिंकून विश्वचषक टी-२० ची तयारी अधिक भक्कम करण्याचे धोनीचे मनसुबे असतील. बांगलादेशचा कर्णधार मुशर्रफ मुर्तझा याच्या नजरा मात्र विश्वचषकावर नाहीत. कारण, या संघाला धरमशाला येथे हॉलंड आणि आयर्लंडविरुद्ध पात्रता सामने खेळायचे आहेत.
२५ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत धोनी अॅन्ड कंपनीला विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल; कारण यजमान संघाला चाहत्यांचा अधिक पाठिंबा असेल. धोनी, युवी, कोहली यांना मोठ्या सामन्यात विजय मिळविण्याचा अनुभव असला, तरी प्रतिस्पर्धी संघातील मशर्रफ, शाकीब अल हसन आणि शब्बीर रहमान यांना ही सवय नाही.
२०१२ मध्ये हा संघ आशिया चषक जिंकण्याच्या स्थितीत होता; मात्र अंतिम सामन्यात त्यांना पाककडून पराभव पत्करावा लागला होता. त्या सामन्यात चुका करणाऱ्या मोहम्मदुल्लाहने यंदा पाकच्या अन्वर अलीला चौकार ठोकून संघाला अंतिम फेरीत नेऊन ठेवले.
भारत-बांगलादेशने या स्पर्धेत चांगलीच कामगिरी केली आहे; पण भारत अधिक संतुलित वाटतो. गेल्या दहापैकी नऊ सामन्यांत भारताने विजय मिळवला. ११ वा विजय बांगलादेशवर त्यांच्याच भूमीत मिळवायचा असल्याने कठीण वाटतो. अशावेळी युवा हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर दडपण असेल. रोहित आणि शिखर हे डावाची सुरुवात करतील.
कोहलीने दोन्ही सामन्यांत मॅचविनरची भूमिका वठविल्याने अंतिम सामन्यातही त्याच्याकडून अशीच अपेक्षा असेल. खेळपट्टी उसळी घेणारी नसल्याने रैनादेखील उपयुक्त ठरू शकतो. युवीदेखील फॉर्ममध्ये परतला आहे.
विकेट मंद असल्याने त्याचा फिरकी मारादेखील उपयुक्त ठरू शकेल. कर्णधार धोनी फिनिशर आहेच; पण आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर डावाला आकार देण्याची जबाबदारी त्याच्यावरच असेल.
आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे बांगलादेशाचा कर्णधार मशर्रफी मुर्तझा याने कबूल केले; पण मायदेशात खेळण्याचा लाभ घेऊन यजमान संघाला रविवारी खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीत निकाल बदलण्याची संधी आहे, अशी प्रतिक्रियाही त्याने या वेळी व्यक्त केली.भारतीय संघ शानदार फॉर्मात असून, या स्पर्धेत टीम इंडियाने सलग ४ विजय नोंदविले आहेत. त्यात बांगलादेशाविरुद्ध सलामीच्या लढतीत ४५ धावांनी मिळविलेल्या विजयाचाही समावेश आहे. मुर्तझाने स्पष्ट केले, की रविवारी शेर -ए-बांगला स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीत प्रबळ दावेदार कोण, याबाबत चर्चा व्हायला नको.
सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत मुर्तझा म्हणाला, ‘‘भारत जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे, याची आम्हाला चांगली कल्पना आहे. आम्ही यावर चर्चा करू इच्छित नाही. आमच्या संघात युवा खेळाडूंचा समावेश असून, सांघिक कामगिरीच्या जोरावर आम्ही सामने जिंकले आहेत. आमच्या संघात एकट्याच्या बळावर विजय मिळविणारा टी-२० क्रिकेटमधील स्टार खेळाडू नाही. प्रेक्षक, खेळपट्टी आणि परिस्थिती आमच्यासाठी अनुकूल राहतील; पण त्यावरून अंतिम सामन्यातील विजेता ठरणार नाही, हे नक्की.’’
इतर सामन्यांसारखाच अंतिम सामना
या स्पर्धेतील प्रत्येक सामना आम्ही बाद फेरीप्रमाणे खेळलो. त्यामुळे अंतिम सामनादेखील इतर सामन्याप्रमाणेच आम्ही खेळू या स्पर्धेतील बांगलादेश विरुद्धचा सामना आम्ही जिंकलेला आहे. तसेच संघातील खेळाडूदेखील अनूभवी आहेत. याचा फायदा नक्कीच मिळेल. खरेतर प्रत्येक सामना अवघड असतो. -रवी शास्त्री
६ जून २००९
नॉटिंगहॅम येथे झालेल्या या लढतीत भारताने २५ धावांनी विजय मिळविला होता. या सामन्यात भारताने २० षटकांत ५ बाद १८० धावा केल्या होत्या. यामध्ये गौतम गंभीरने ४६ चेंडूंत ५०, रोहित शर्माने २३ चेंडंूत ३ चौकार व २ षटकारांच्या साहाय्याने ३६ आणि युवराज सिंगने १८ चेंडूंत तीन चौकार व ४ षटकार ठोकून ४१ धावा केल्या होत्या. बांगलादेश संघाच्या ८ बाद १५५ धावा झाल्या होत्या. मोहम्मद अशफूलने ४१ धावा केल्या होत्या. भारताकडून प्रज्ञान ओझाने २१ धावांत ४, तर इशांत शर्माने ३४ धावांत दोन विकेट घेतल्या होत्या.
२८ मार्च २०१४
ढाका येथे झालेल्या लढतीत भारताने
८ विकेट ९ चेंडू राखून बांगलादेशचा पराभव केला होता. या सामन्यात बांगलादेशने ७ बाद १३८ धावा केल्या होत्या. अनामुल हक्कने ४४ व महामुदुल्लाने नाबाद ३३ धावा केल्या होत्या. भारताकडून अमित मिश्राने ३ व आर. आश्विनने २ विकेट घेतल्या होत्या. भारताकडून रोहित शर्माने ४४ चेंडूंत ५ चौकार व १ षटकाराच्या साहाय्याने ५६, विराट कोहलीने ५० चेंडूंत ३ चौकार व १ षटकार मारून नाबाद ५७, महेंद्रसिंह धोनीने १२ चेंडूंत १ चौकार व दोन षटकार मारून नाबाद २२ धावा केल्या.
२४ फेब्रुवारी २०१६
मिरपूर येथे नुकत्याच झालेल्या
लढतीत भारताने बांगलादेशचा ४५
धावांनी पराभव केला होता. या सामन्यात भारताने प्रथम करताना ६ बाद १६६ धावा केल्या होत्या. रोहित शर्माने ५५ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकार मारून ८३ धावा केल्या होत्या. हार्दिक पंड्याने १८ चेंडूंत ४ चौकार व १ षटकाराच्या साहाय्याने ३१ धावा केल्या होत्या. बांगलादेशचा डाव ७ बाद १२१ धावांत संपुष्टात आला होता. शब्बीर रहमाने ४४ धावा केल्या होत्या. आशिष नेहराने २३ धावांत ३ विकेट घेतल्या होत्या.
> भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर
धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराजसिंग, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, आशिष नेहरा, जसप्रीत बुमराह, अजिंक्य रहाणे, हरभजनसिंग, पवन नेगी, भुवनेश्वर कुमार.
बांगलादेश : मुशर्रफ मुर्तझा (कार्णधार), तामिम इक्बाल, सौम्या सरकार, शब्बीर रहमान, मुशफिकर रहीम, शाकीब अल हसन, महमुदुल्लाह रियाद, मोहम्मद मिथून, अराफात सन्नी, तस्कीन अहमद, अल अमीन हुसेन, नासिर हुसेन,अबू हैदर, नुरुर हसन, इमरुल कायेस.