आशियाई तिरंदाजी : अभिषेक-ज्योती यांचा कम्पाऊंड ‘सुवर्ण वेध’!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 04:25 AM2019-11-28T04:25:48+5:302019-11-28T04:36:32+5:30
अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा व्हेन्नम यांच्या मिश्र भारतीय जोडीने २१ व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेच्या कम्पाऊंड प्रकारात बुधवारी सुवर्णमय कामगिरी केली.
बँकॉक : अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा व्हेन्नम यांच्या मिश्र भारतीय जोडीने २१ व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेच्या कम्पाऊंड प्रकारात बुधवारी सुवर्णमय कामगिरी केली. या कामगिरीमुळे भारतीय संघाला या स्पर्धेत एकूण सात पदकांची कमाई झाली आहे.
वर्मा-ज्योती जोडीने चायनीज तायपेईची जोडी ह्यूआन चेन-चीह लूह चेन या जोडीवर १५८-१५१ अशा गुणफरकाने सरशी साधली. स्पर्धेत भारताला एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांची कमाई झाली. याआधी वर्मा सांघिक फेरीत अचूक वेध घेण्यात अपयशी ठरला. यामुळे द. कोरियाविरुद्ध भारताला रौप्यवर समाधान मानावे लागले.
कोरियाने ही लढत २३३-२३२ अशी जिंकली. वर्मा म्हणाला, ‘वेगवान वारे वाहत असल्याने परिस्थिती आव्हानात्मक होती. सुवर्ण जिंकण्याची ही अखेरची संधी होती. आम्ही यशस्वी ठरलो, हे सकारात्मक संकेत आहेत.’
पुरुष सांघिक स्पर्धेत अव्वल मानांकन लाभलेला वर्मा, रजत चौहान व मोहन भारद्वाज या त्रिकूटाने पहिल्या फेरीत ५८ गुणांची कमाई केली. दुसऱ्या फेरीत मात्र कोरियाने एका गुणाची आघाडी घेतली. भारताने तिसºया फेरीत अखेरच्या तीन संधीत प्रत्येकी ९ गुण मिळवले. याचा फटका बसल्याने कोरियाने सुवर्ण जिंकले.
ज्योती, मुस्कान किरार व प्रिया गुर्जर या भारताच्या महिला संघालादेखील जेतेपदाचा बचाव करण्यात अपयश आले. कोरियाविरुद्धची लढत भारताने २३१-२१५ अशा फरकाने गमावली.
भारतीय तिरंदाजी महासंघाच्या निलंबनामुळे या स्पर्धेत भारतीय खेळाडू जागतिक तिरंदाजी महासंघाच्या ध्वजाखाली सहभागी झाले आहेत. गुरुवारी होणाºया आॅलिम्पिक पात्रता फेरीत सहभागी होण्यासाठी भारतीय खेळाडूंना अशी संधी मिळाली होती. पुरुष संघाने आधीच विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेतून आॅलिम्पिक कोटा मिळविला आहे. महिला संघाचेही आॅलिम्पिक कोटा मिळविण्याचे प्रयत्न असतील.