आशियाई बॅडमिंटन : भारताला कांस्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 03:20 AM2020-02-16T03:20:57+5:302020-02-16T03:21:35+5:30
आशियाई बॅडमिंटन : उपांत्य फेरीत इंडोनेशियाविरुद्ध पराभूत
मनिला : लक्ष्य सेनने आशियन गेम्सचा चॅम्पियन जोनाथन क्रिस्टीविरुद्ध धक्कादायक विजय नोंदवला असला तरी भारतीय पुरुष संघाला त्याचा लाभ घेता आला नाही. भारतीय संघाला शनिवारी आशियाई टीम बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत दोनवेळचा गत चॅम्पियन इंडोनेश्यिाविरुद्ध २-३ ने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. लक्ष्य (३१ वे मानांकन) याने जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावरील जोनाथनविरुद्ध एकेरीच्या दुसऱ्या लढतीत २१-१८, २२-२० ने सनसनाटी विजय मिळवत भारताचे आव्हान कायम राखले. एकेरीच्या पहिल्या लढतीत साई प्रणीत पहिल्या गेममध्ये अँथोनी जिनटिंगविरुद्ध ६-२१ ने पिछाडीवर असताना रिटायर्ड हर्ट झाला.
२०१८ चा सालोर्लक्स ओपन चॅम्पियन शुभंकर डे याने एकेरीच्या तिसºया लढतीत जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानावर असलेल्या शेसार हिरेन रुस्तावितोचा २१-१७, २१-१५ ने पराभव करीत धक्कादायक निकाल नोंदवला. त्यामुळे भारतीय संघाने २-२ अशी बरोबरी साधली.
त्यामुळे दुहेरीची दुसरी लढत निर्णायक ठरली. त्यात चिराग शेट्टी व लक्ष्य सेन कोर्टवर उतरले, पण त्यांना मार्कस फर्नाल्डी गिडियोन व केव्हिन संजया सुकामुलजियो या जागतिक क्रमवारीतील अव्वल जोडीची बरोबरी साधता आली नाही. त्यांना केवळ २४ मिनिटांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. इंडोनेशियाच्या जोडीने २१-६, २१-१३ ने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. भारतीय पुरुष संघ या स्पर्धेत कांस्यपदकाचा मानकरी ठरला. यापूर्वी भारतीय संघाने २०१६ मध्ये हैदराबादमध्येही कांस्यपदक पटकावले होते.
एम.आर. अर्जुन व ध्रुव कपिला या दुहेरीच्या जोडीने कडवा संघर्ष केला, पण त्यांना तीन वेळचे विश्व चॅम्पियन व दुसरे मानांकनप्राप्त मोहम्मद अहसन व हेंड्रा सेटियावानविरुद्ध १०-२१, २१-१४, २१-२३ ने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे इंडोनेशिया संघाने २-१ अशी आघाडी घेतली.