आशियाई बॉक्सिंग - मेरी कोम, सोनिया अंतिम फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 04:14 AM2017-11-08T04:14:29+5:302017-11-08T04:16:11+5:30
पाच वेळा विश्वविजेतेपदाचा मान मिळविणारी एम. सी. मेरी कोमने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पाचवे सुवर्णपदक पटकावण्याच्या दिशेने वाटचाल करताना मंगळवारी
हो ची मिन्ह सिटी : पाच वेळा विश्वविजेतेपदाचा मान मिळविणारी एम. सी. मेरी कोमने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पाचवे सुवर्णपदक पटकावण्याच्या दिशेने वाटचाल करताना मंगळवारी अंतिम फेरीत प्रवेश केला, तर सोनिया लाथेरनेही अंतिम फेरीत स्थान निश्चित केले.
भारतासाठी आजचा दिवस मात्र निराशाजनक ठरला. चार वेळा सुवर्णपदक पटकावणारी एल. सरितादेवीला (६४ किलो) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत सरितादेवीला चीनच्या दोऊ डॅनविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
मेरी कोमने जपानच्या सुबासा कोमुराचा ५-० ने पराभव केला. तिने सहापैकी पाचव्यांदा या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. फायनलमध्ये मेरी कोमला उत्तर कोरियाच्या किम हयांगच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. हयांगने मंगोलियाच्या एम. म्यांगमारदुलामचा पराभव केला. अंतिम फेरीत विजय मिळवला तर मेरी कोमचे ४८ किलो वजनगटात पहिले आशियाई सुवर्णपदक राहील.
राज्यसभा सदस्य, आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती ३५ वर्षीय मेरी कोम पाच वर्षे ५१ किलो वजनगटात सहभागी झाल्यानंतर ४८ किलो वजनगटात परतली आहे. जपानच्या बॉक्सरने तिच्याविरुद्ध बचावात्मक खेळ केला. मेरी कोमने दुसºया फेरीत आक्रमक खेळ करीत विजय मिळवला.
सोनियाने आक्रमक प्रतिस्पर्धी उझ्बेकिस्तानच्या योदगोरोय मिर्जाएवाचा पराभव केला. शिक्षाने (५४ किलो) आपल्या गटात कांस्यपदक पटकावले. तिला चिनी ताइपेची माजी युवा विश्व चॅम्पियन लिन यू तिंगविरुद्ध उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. प्रियंका चौधरी (६० किलो) कांस्यपदकाची मानकरी ठरली. तिला उपांत्य फेरीत कोरियाच्या ओ यिओंजीने पराभूत केले. (वृत्तसंस्था)