Asian Champions Trophy: भारताचा पाकिस्तानवर 3-1 ने मोठा विजय, सेमीफायनलमध्ये दमदार एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 06:27 PM2021-12-17T18:27:03+5:302021-12-17T18:31:56+5:30
भारताच्या हरमनप्रीतने 2 आणि आकाशदीपने 1 गोल करत भारतीय संघाची पकड मजबुत केली.
पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय नोंदवत भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. हरमनप्रीतच्या दोन आणि आकाशदीपच्या एका गोलच्या जोरावर टीम इंडियाने पाकिस्तानचा 3-1 ने पराभव केला. पाकिस्तानच्या जुनैदने पाकिस्तानकडून एकमेव गोल केला. हरमनप्रीतने दोनदा पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले. सामन्यात भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये आघाडी घेत पाकिस्तानला पुनरागमनाची संधी दिली नाही.
सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी चांगला खेळ करत प्रत्येकी एक गोल केला. आकाशदीपने भारतासाठी दुसरा गोल करत टीम इंडियाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर पाकिस्तानच्या जुनैद मंजूरने गोल करत भारताची आघाडी कमी केली. मात्र, नंतर हरमनप्रीतने या सामन्यात दुसरा गोल करत भारताला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली, जी निर्णायक ठरली.
A phenomenal all-round performance earns India the BIG 𝐖 over Pakistan 💙#IndiaKaGame#HeroACT2021pic.twitter.com/uxwWQ7Pm9A
— Hockey India (@TheHockeyIndia) December 17, 2021
भारताचा आक्रमक खेळ
सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत पहिल्या क्वार्टरमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारतीय संघाने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. पाकिस्तानच्या गोलपोस्टवर सतत हल्ले केले, मात्र पाकिस्तानच्या बचावफळीने भारताला उत्तम बचाव करत तीनवेळा गोल करण्यापासून रोखले. पाकिस्तानचा गोलरक्षक अली अमजदने दोन अप्रतिम बचाव केले.
हरमनप्रीतने दुसरा गोल केला
स्पर्धेत पाकिस्तानला प्रथमच पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. नीलम संजीवच्या चुकीमुळे पाकिस्तानला ही संधी मिळाली, मात्र सूरज कारकेराने डाव्या पायाने चेंडू रोखून त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. काही वेळातच भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि हरमनप्रीतने सामन्यातील दुसरा गोल करत टीम इंडियाची आघाडी मजबूत केली. या सामन्यातही पाकिस्तानला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण इथेही गोल करता आला नाही.
एशियाडमध्ये दोन्ही संघ नऊ फायनल खेळले
भारत आणि पाकिस्तान या आधी सात आशियाई क्रीडा स्पर्धेच्या हॉकी फायनलमध्ये आमनेसामने आले होते. आशियाई खेळांमध्ये त्यांनी एकमेकांविरुद्ध एकूण नऊ फायनल खेळले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानने सात आणि भारताने दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. दोन्ही देशांनी 1956 ते 1964 पर्यंत सलग तीन ऑलिम्पिक फायनलमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये भारताने दोन, तर पाकिस्तानने एकदा विजय मिळवला होता.
गेल्या वेळी हे दोन्ही संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी टप्प्यात आमनेसामने आले होते आणि तेव्हाही भारताने 3-1 अशा फरकाने विजय मिळवला होता. भारतीय संघाने आतापर्यंत पाकिस्तान, कोरिया आणि बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांत 14 गोल केले आहेत. भारत सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानने जपानसोबत गोलशून्य बरोबरी साधली आणि भारताविरुद्धच्या पराभवानंतर चौथ्या स्थानावर आहे.