Asian Game 2018 : भेटा, आशियाई स्पर्धेतील अब्जाधीश खेळाडूला; वय ऐकूनही बसेल धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 01:17 PM2018-08-17T13:17:40+5:302018-08-17T13:17:56+5:30
Asian Game 2018 : प्रचंड मेहनत, सातत्य आणि दृढनिश्चय यांच्या जोरावर खेळाडूला यशाचा टप्पा गाठता येतो. यशाचे इमले सर केल्यानंतरच खेळाडूची दखल घेतली जाते आणि त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला जातो.
मुंबई- प्रचंड मेहनत, सातत्य आणि दृढनिश्चय यांच्या जोरावर खेळाडूला यशाचा टप्पा गाठता येतो. यशाचे इमले सर केल्यानंतरच खेळाडूची दखल घेतली जाते आणि त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला जातो. त्यानंतर कुठे त्याची आर्थिक भरभराट होते. शनिवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई स्पर्धेत पदक जिंकून सुरक्षित भविष्याचे स्वप्न बाळगणारे अनेक खेळाडू आहेत. मात्र जकार्तामध्ये होणाऱ्या या स्पर्धेत ६० हजार कोटींहून अधिक संपत्ती असलेला उद्योगपती, खेळाडू म्हणून मैदानावर उतरणार आहे. आशियाई क्रीडा गावात सध्या या अब्जाधीश उद्योगपतीचीच चर्चा आहे.
मिचेल बॅमबँग हार्टोनो असे त्या व्यक्तीचे नाव असून इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ते परिचित आहेत. आशियाई स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इंडोनेशियाच्या खेळाडूमधे वयस्कर खेळाडूचा मानही ७८ वर्षीय बॅमबँग यांनी मिळवला आहे. बॅमबँग आणि त्यांचा बंधू बडी हार्टोनो यांनी सलग दहा वर्षे इंडोनेशियातील श्रीमंत उद्योगपतीच्या फोर्ब्स यादीत नाव कायम राखले आहे. हार्टोनो बंधूनी डीजारम क्लोव्ह सिगारेट कंपनी आणि BCA बँक खरेदी केली आणि त्याची एकूण किंमत ३४ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे.
आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी बॅमबँग यांनी नुकताच युरोप आणि लंडनचा दौरा केला. आशियाई स्पर्धेत ते ब्रिज ( पत्त्यांचा खेळ) प्रकारात सहभागी होणार आहेत. " शार्प मेमरीसाठी मी ब्रिज खेळतो.. तसे माझी पहिली आवड ही ताय ची आहे आणि त्याने मला लक्ष केंदित करायला मदत मिळ्ते, " असे बॅमबँग यांनी सांगितले.
बॅमबँग यांनी सहाव्या वर्षांपासून ब्रिज खेळायला सुरुवात केली. ब्रेट टोर पोलीसह बॅमबँग आशियाई स्पर्धेत मिश्र गटात खेळणार आहेत. आशियाई स्पर्धेत बॅमबँग यांनी सुवर्णपदकाचे लक्ष्य ठेवले आहे, परंतु त्यांनी या पदकासाठी इंडोनेशिया सरकारकडून देण्यात येणारे बक्षीस रक्कम न घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम खेळाडूंच्या सुविधांसाठी दान करण्याचे त्यांनी ठरवले आहे.
वयस्कर खेळाडूचा मान कोणाला?
बॅमबँग हे इंडोनेशियाचे वयस्कर खेळाडू आहेत आणि त्यांना मलेशियाच्या ब्रिज खेळाडू ली हूंग फाँग (८१ वर्ष) यांनी मागे टाकले आहे.